मनपाच्या इंग्रजी शाळा बंद करण्यास विरोध
By Admin | Updated: March 16, 2016 22:48 IST2016-03-16T22:45:48+5:302016-03-16T22:48:05+5:30
महासभा : शिक्षण समितीवर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

मनपाच्या इंग्रजी शाळा बंद करण्यास विरोध
नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे रूपांतर सेमी इंग्रजी शाळांमध्ये करण्यास महासभेत सदस्यांनी तीव्र विरोध दर्शविला. इंग्रजी शाळांना प्रशिक्षित शिक्षकवर्ग आणि मूलभूत सुविधा पुरवा, अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी सदरचा प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविण्याचा आणि त्यांनी केलेल्या सूचनांवरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.
महापालिकेच्या वतीने सन २००८ पासून पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. सदर शाळा सेमी इंग्रजी झाल्यास मनपा इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या, मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांची माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची सोय होणार असल्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेवर ठेवला होता. या प्रस्तावावर बोलताना शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण यांनी सदरचा प्रस्ताव शिक्षण समितीवर येणे अपेक्षित होता, असे सांगत समिती गठित झाल्यापासून बैठकच झाली नसल्याची व्यथा बोलून दाखविली. हर्षा बडगुजर यांनी इंग्रजी ही व्यवहाराची भाषा बनली असल्याने सेमी इंग्रजी करण्याचा चुकीचा निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगितले. कुणाल वाघ, नंदिनी जाधव, शोभा आवारे, प्रकाश लोंढे यांनीही इंग्रजी शाळा बंद करण्यास विरोध दर्शविला. सुधाकर बडगुजर यांनी सदर प्रस्ताव शिक्षण समितीकडूनच येणे अपेक्षित असल्याचे सांगत इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मनपाच्या शाळांवर सुरक्षारक्षक नेमण्याचीही सूचना केली. विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनी गरीब मुलांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित ठेवू नका, अशी विनंती केली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले, कच्च्या पायावर इमारत टिकू शकत नाही. मनपाच्या इंग्रजी शाळांमध्ये २५ शिक्षकांची गरज असताना केवळ दहा शिक्षक
आहेत. एक शाळा तर मदतनीस चालवित आहे. काही शिक्षक इंग्रजी डिएडही झालेले नाहीत. शाळा चालवायच्या असतील तर आधी पाया पक्का करा व त्याबाबत स्पष्ट धोरण ठरविण्याची सूचना केली. महापौर अशोक मुर्तडक यांनी सदरचा प्रस्ताव शिक्षण समितीवर परत पाठविण्याचा आणि समितीने सुचविलेल्या धोरणावरच निर्णय घेण्याचे मान्य केले. तसेच मनपाच्या शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचेही आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. (प्रतिनिधी)