भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या निर्णयाला सीमा हिरे यांचा विरोध
By Admin | Updated: January 12, 2016 00:20 IST2016-01-12T00:19:38+5:302016-01-12T00:20:14+5:30
सिडको मंडल अध्यक्षपदावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या निर्णयाला सीमा हिरे यांचा विरोध
सिडको : भारतीय जनता पार्टीच्या सिडको मंडल अध्यक्षपदी गिरीश भदाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. यानंतर आमदार सीमा हिरे व त्यांच्या समर्थकांनी या निवडीस विरोध दर्शवित निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणीच सुमारे दीड तास ठिय्या मारीत निषेध नोंदविला.
सिडकोतील निकिता मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता भाजपाच्या सिडको मंडल अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या अध्यक्षपदासाठी एका गटाकडून गिरीश भदाणे व आमदार सीमा हिरे गटाकडून बाळासाहेब पाटील व यशवंत नेरकर आदि तीन नावे होती. सिडको मंडल अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या तिघा उमेदवारांची नावे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविण्यात आली होती. आज निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मोरूस्कर यांनी प्रदेशाध्यक्षांच्या आदेशान्वये सिडको मंडल अध्यक्षपदी गिरीश भदाणे यांचे नाव घोषित केले. यानंतर नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे समर्थकांनी या निवडीस आक्षेप घेत घोषणाबाजी केली. तसेच आमदार सीमा हिरे यासह समर्थकांनी निवडणूक प्रक्रियाच्या ठिकाणीच दीड तास ठिय्या आंदोलन करीत निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू असतानाच काही पदाधिकाऱ्यांनी याठिकाणाहून काढता पाय घेतला. परंतु यानंतरही सीमा हिरे समर्थकांची घोषणाबाजी सुरूच होती. सुमारे दीड तासानंतर सीमा हिरे यांनी मंडल अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे सिडको मंडल अध्यक्षपदी दोघांची निवड करण्यात आली. आमदार सीमा हिरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षदा लावत मंडल अध्यक्ष घोषित करीत पक्षालाच प्रतिआव्हान दिले. यावेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, जगन पाटील, गोपाळ पाटील, सुरेश पाटील, नंदू शिंदे, शेखर निकुंभ, सतीश सोनवणे, कैलास अहिरे, प्रदीप पेशकर आदि उपस्थित होते. (वार्ताहर)