बुद्धांची पुरातन मूर्ती पाहण्याची संधी
By Admin | Updated: May 10, 2017 00:42 IST2017-05-10T00:42:08+5:302017-05-10T00:42:26+5:30
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात असलेल्या वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली गौतम बुद्धांची मूर्ती बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे.

बुद्धांची पुरातन मूर्ती पाहण्याची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात असलेल्या वस्तुसंग्रहालयात शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली गौतम बुद्धांची मूर्ती बघण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे.बुधवारी (दि.१०) बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयात दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही मूर्ती सगळ्यांना पाहता येईल, अशी माहिती सावानाचे वस्तुसंग्रहालय सचिव देवदत्त जोशी यांनी दिली. वस्तुसंग्रहालयात असलेली ही गौतम बुद्धांची मूर्ती नेपाळ नरेश यांनी साताऱ्याचे राजे भोसले यांना भेट दिली होती. सातारा घराण्याच्या महाराणी कल्पनाराजे भोसले यांनी त्यांची मुलगी मनीषाराजे आणि जावई धनंजय पाटील यांना ही पुरातन बुद्ध मूर्ती भेट दिली होती. नाशिकचे वास्तुविशारद शिवाजीराव पाटील यांचा मुलगा धनंजय पाटील यांनी सावानाच्या वास्तुसंग्र्रहालयास ही मूर्ती भेट दिली आहे.बुधवारी (दि. १0) सकाळी साडेदहा वाजता महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाचनालयातील वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन फेब्रुवारी २००४ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वस्तुसंग्रहालयात अत्यंत दुर्मीळ आणि पुरातन वस्तू असून बाबासाहेब वैशंपायन, दिवंगत बापूसाहेब काळे, ज्येष्ठारामभाई बटाविया, लक्ष्मीकांत वर्मा, सुरेश जोशी (अहमदनगर), दिलीप पणसेकर, श्रीकृष्ण धामणकर, सुधीर शिंगणे, ललिता बापट (मुंबई) यांच्या कुटुंबीयांतर्फे सावानाच्या वस्तुसंग्रहालयासाठी विविध आणि अनमोल वस्तू देण्यात आल्या आहेत. या वस्तुसंग्रहालयात असलेल्या दीड हजाराहून अधिक मूर्ती बघण्यासाठी नागरिकांनी वस्तुसंग्रहालयाला भेट देण्याचे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.