विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
By Admin | Updated: January 14, 2017 00:37 IST2017-01-14T00:36:24+5:302017-01-14T00:37:04+5:30
जिल्हा परिषद : अर्धा डझन आजी-माजी आमदारांत रंगणार सामना

विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
नाशिक : दोन-अडीच वर्षांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदारांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे. किमान अर्धा डझनभर आजी-माजी आमदारांमध्ये यानिमित्ताने प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सामना रंगणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आमदार माणिकराव कोकाटे यांना राजाभाऊ वाजे यांनी पराभूत करीत आमदारकी मिळविली होती. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीतही राजाभाऊ वाजे यांनी नगराध्यक्षपदासह शिवसेनेला बहुमत मिळवित कोकोटे यांना दुसऱ्यांदा झटका दिला. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोकाटेंविरुद्ध वाजे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कोकाटे यांना विधानसभा आणि नगरपंचायतींतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. इगतपुरी मतदारसंघातूनही आमदार निर्मला गावित यांनी माजी आमदार शिवराम झोले व काशीनाथ मेंगाळ यांना पराभवाची धूळ चारली आहे. आता दोन्ही माजी आमदार शिवसेनेत असल्याने त्यांनी विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चंग बांधला आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातही माजी आमदार शिरीषकुमार कोतवालविरुद्ध माजी जि. प.सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यात सामना रंगला. त्यात कोतवाल - कुंभार्डे पराभूत होऊन डॉ. राहुल अहेर यांना विजयाची संधी लाभली. दरम्यान, कुंभार्डे यांनी भाजपात प्रवेश करून नगरपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारत नगराध्यक्षपदी भाजपाचे भूषण कासलीवाल यांची वर्णी लावली. आता जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा तळेगाव-रोही गटातून कोतवाल-कुंभार्डे यांचा सामना रंगणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार धनराज महाले यांना पराभूत करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा आमदारकी मिळविली. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्त्याने माजी आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर यांना आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. नांदगावमध्येही आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर यांना विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीचा आधार घेता येईल.
(प्रतिनिधी)