१२ ऑक्टोबरपर्यंत १७ नंबर फॉर्म भरण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:26+5:302021-09-10T04:20:26+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षांसाठी ...

१२ ऑक्टोबरपर्यंत १७ नंबर फॉर्म भरण्याची संधी
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नं. १७ भरून प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खासगीरीत्या ऑनलाईन अर्ज करून परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी नोंदणी शुल्क व प्रक्रिया शुल्क निश्चित करण्यात आले असून, दहावीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये नोंदणी शुल्क व शंभर रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये नोंदणी शुल्कासह शंभर रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा व दाखला दिल्याचा दिनांक ग्राह्य धरण्याच्या सूचना मंडळाने केल्या आहेत. कोविड १९ विषाणूच्या प्रसारामुळे दहावी व बारावी परीक्षा २०२१ चा निकाल जुलै-ऑगस्टमध्ये लागलेला आहे. त्यामुळे खासगी विद्यार्थी ऑनलाईन नाव नोंदणीबाबत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दाखल्यावरील शाळा सोडल्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२१ ग्राह्य धरण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, हे बदल केवळ कोविड १९ प्रादुर्भावामुळे २०२२ च्या परीक्षांपुरतेच लागू राहणार असल्याचेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केेले आहे.