जपानी उद्योगांशी सहकार्याची संधी
By Admin | Updated: September 27, 2014 00:21 IST2014-09-27T00:21:29+5:302014-09-27T00:21:45+5:30
भोगले : भारतात होणार मोठी गुंतवणूक

जपानी उद्योगांशी सहकार्याची संधी
सातपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यात जपानने पुढील पाच वर्षांत भारतात दोन लाख दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असल्याने भारतीय उद्योजकांना एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी जपानी उद्योजकांशी ‘कोलॅब्रेशन’ करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी केले.
‘दृष्टिक्षेपात जपानमधील उद्योग’ या विषयावर निमात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्यात उद्योजकांच्या शिष्टमंडळात भोगले यांचा समावेश होता. जपानमधील उद्योग, त्यांची कार्यप्रणाली यांचा अनुभव कथन करताना भोगले यांनी सांगितले की, जपानी लोक सहसा कोणावर विश्वास ठेवत नाहीत. ते फक्त ‘सिस्टीम’वरच भर देतात. भारतीय उद्योजकांनीही सिस्टीमप्रमाणे व्यवहार केला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी दौऱ्यात आम्ही कटोरा होऊन गुंतवणूक मागायला आलो असा संदेश दिला नाही, तर इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, संरक्षण साहित्य, कुशल मनुष्यबळ प्रशिक्षण यात गुंतवणूक करावी, असा संदेश दिला आहे; शिवाय या दौऱ्यात सहभागी ३२ उद्योजकांशी जपानच्या उद्योजकांबरोबर चर्चा घडवून आणली व भारतीय उद्योजक महत्त्वाचे आहेत, या उद्योजकांशी करार करण्याची संधी जपानी उद्योजकांना आहे, असे आवाहन केले. आता जपानी उद्योजक गुंतवणुकीस तयार झाले आहेत. भारतीयांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे अध्यक्ष रवि वर्मा, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, नाईसचे उपाध्यक्ष संजीव नारंग, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, मंगेश पाटणकर आदि उपस्थित होते. यावेळी देवेंद्र बापट, ज्ञानेश्वर गोपाळे, आशिष नहार, व्हिनस वाणी, उन्मेश कुलकर्णी, दिलीप बोरावके, सुधाकर देशमुख, दिलीप महाले, विशाल जोशी, हर्षद ब्राह्मणकर, सुधीर मुतालिक आदि उपस्थित होते. (वार्ताहर)