स्वच्छ भारत अभियान प्रशिक्षणात संधी
By Admin | Updated: August 19, 2016 00:13 IST2016-08-19T00:12:39+5:302016-08-19T00:13:17+5:30
जिल्हा परिषद : दिल्ली येथे दोनदिवसीय शिबिर

स्वच्छ भारत अभियान प्रशिक्षणात संधी
नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नवी दिल्ली येथे राष्ट्रीय दोनदिवसीय स्वच्छता शिबिरात राज्यातून नाशिक जिल्हा परिषदेला संधी मिळाली होती. या दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात स्वच्छ भारतविषयक स्वच्छतेचे धडे देशभरातील जिल्हा परिषदांना देण्यात आले.
राज्यातून एकमेव नाशिक जिल्हा परिषदेचा या स्वच्छता शिबिरात समावेश करण्यात आला होता. नाशिक शहरालगतच असलेल्या गोवर्धन येथील निर्मल ग्राम केंद्राची दखल घेऊन तेथील प्रचारक श्रीकांत नावरेकर यांनाही या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेकडून अध्यक्ष विजयश्री चुंबळे व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. देशभरातील महाराष्ट्रासह झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, हरियाणासह अन्य राज्यांतील जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रतिनिधींचा या शिबिरात समावेश होता. नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रमुख समन्वयक निपुण विनायक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिक्कीम हे शंभर टक्के निर्मल ग्राम राज्य असून, हे राज्य देशातील सर्वाधिक सुंदर व स्वच्छ राज्य म्हणून ओळखले जाते. डोंगराळ प्रदेशाने नटलेल्या या राज्यात पर्यटकांची वर्दळ असूनसुद्धा राज्याने स्वच्छतेबाबत कठीण परिश्रम घेतल्याचे प्रशिक्षण शिबिरात सहभागी मार्गदर्शकांनी सांगितले. (प्रतिनिधी)