सायंकाळी पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:51 IST2017-10-13T00:51:01+5:302017-10-13T00:51:12+5:30
शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणे तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र होते. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ शरणपूररोडवरील वाहतूक साचलेल्या पाण्यातून सुरू होती.

सायंकाळी पावसाची उघडीप
नाशिक : शहरात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून, मंगळवार वगळता पावसाचा जोर आजपर्यंत कायम आहे. दुपारी पावणे तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली होती. शहरातील सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचले होते. महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत पावसाच्या पाण्याचे तळे साचल्याचे चित्र होते. सुमारे पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ शरणपूररोडवरील वाहतूक साचलेल्या पाण्यातून सुरू होती.
गुरुवारी (दि.१२) दुपारी पावणे तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली आणि पुन्हा नाशिककरांना धडकी भरली. दिवाळीच्या खरेदीवर ‘पाणी फिरल्याची’ भावना निर्माण झाली; मात्र साडेपाच वाजेनंतर पावसाने उघडीप दिल्याने नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडले होते. यामुळे संध्याकाळी रविवार कारंजा, निमाणी, पंचवटी कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, शालिमार या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून तीन हजारांपेक्षा अधिक क्यूसेकने पाणी नदीपात्रात प्रवाहित होते; मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी झाले. तसेच गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातही गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणाचा विसर्गही कमी झाला. सकाळी ६ वाजेपासून २८७४ क्यूसेकचा विसर्ग दुपारी १२ वाजता १७३२ झाला. त्यानंतर तासाभराने विसर्ग थेट ११०६ वर आला. दोन दिवसांपासून वाढलेली गोदावरीची पाण्याची पातळीही गुरुवारी दुपारी कमी झाली होती.