साईबाबा मंदिर खुले करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:22+5:302021-08-15T04:17:22+5:30
येवला : श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे, ग्रामपंचायत दिवाबत्ती बिल भरणा पंधराव्या वित्त आयोगाऐवजी महाराष्ट्र शासनाने करावा, अशी ...

साईबाबा मंदिर खुले करा
येवला : श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे, ग्रामपंचायत दिवाबत्ती बिल भरणा पंधराव्या वित्त आयोगाऐवजी महाराष्ट्र शासनाने करावा, अशी मागणी भाजप नेते बाबा डमाळे पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. कोश्यारी यांची दिल्ली निवासस्थानी बाबा डमाळे पाटील यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. साई भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करताना कोविड संदर्भात नियम व अटी लागू कराव्यात, शिर्डी साई मंदिर खुले केल्यास शिर्डीतील ठप्प झालेले व्यवसाय पुन्हा सुरळीत होतील, भक्तांना दर्शन होईल, व्यावसायिकांचे थंडावलेले व्यवहार सुरळीत होतील, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत विकासासाठी केंद्र सरकारचा वित्त आयोग हा महत्त्वाचा निधी थेट ग्रामपंचायतींना कृती आराखड्यानुसार वापरता येतो. त्या माध्यमातून गावचा विकास होण्यासाठी मोठी मदत होते. ग्रामपंचायत गावांतर्गत दिवाबत्ती व्यवस्था हा खर्च पूर्वी जिल्हा परिषद करत असे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारने काही भार उचलला होता. परंतु, नव्याने महाराष्ट्र सरकारच्या आदेशाने दिवाबत्ती खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करावा व थकबाकीची वीज बिले भरावीत असे आदेश केलेले आहेत. त्यानुसार वीज थकबाकीच्या रकमा लहान ग्रामपंचायतींना भरणे परवडणारे नाही. कारण जेवढा वित्त आयोगाचा निधी आहे, तेवढाच निधी जवळजवळ दिवाबत्तीवर खर्च होणार आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी वित्त आयोगातून निधी शिल्लक राहणार नाही, म्हणून हा खर्च महाराष्ट्र सरकारने करावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
चर्चेत डमाळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना या बाबी लक्षात आणून दिल्या असता याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी डमाळे यांच्यासमवेत अमोल सोनवणे, संतोष वलटे, वृशाल डमाळे उपस्थित होते. (१४ येवला १)
140821\14nsk_29_14082021_13.jpg
१४ येवला १