सावरकरांशी संबंधित फाइल्स खुल्या करणार
By Admin | Updated: January 18, 2016 23:04 IST2016-01-18T22:57:56+5:302016-01-18T23:04:11+5:30
सुब्रह्मण्यम स्वामी : सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहातील व्याख्यानात घोषणा; हिंदूंनी संघटित झाल्यासच देशाची प्रगती

सावरकरांशी संबंधित फाइल्स खुल्या करणार
नाशिक : जाज्वल्य देशभक्त असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कॉँग्रेसने प्रचंड अन्याय केला. त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याप्रमाणे आता नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या सावरकरांशी संबंधित फाइल्स शोधून त्यांतील सत्य देशासमोर आणणार असल्याची घोषणा माजी केंद्रीय कायदामंत्री व भाजपा नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथालय सप्ताहात काकासाहेब आकूत स्मृती व्याख्यानात ‘भारत : काल, आज व उद्या’ विषयावर ते बोलत होते. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या व्याख्यानात डॉ. स्वामी यांनी कॉँग्रेस नेत्यांवर जहाल टीका केली. ते म्हणाले, सावरकरांची जन्मभूमी असल्याने नाशिक हे स्फूर्तिस्थान आहे. सावरकरांनी देशासाठी मोठा त्याग करूनही कॉँग्रेस व नेहरूंनी त्यांच्यावर अन्याय केला. गांधीहत्त्येशी काही संबंध नसूनही नेहरूंनी या कटात सावरकरांचे नाव घुसडले. या खटल्यात निर्दोष सुटूनही पुढे सावरकरांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता लवकरच सावरकरांशी संबंधित फाइल्स खुल्या करण्याचे काम आपण हाती घेणार आहोत. सावरकरांचे ‘१८५७ चा उठाव’ हे पुस्तक प्रत्येक विद्यापीठात सक्तीचे करायला हवे. लोक यालाही असहिष्णुता म्हणतील; पण ही आवश्यक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गांधीजींची हत्त्या करून नथुराम गोडसेने चूक केली. कारण त्याचा कॉँग्रेसला फायदाच झाला आणि सरदार पटेल, सावरकर यांच्यावर उगाच बालंट आले. नथुरामने गांधींवर दोनच गोळ्या झाडल्या होत्या; मात्र त्यांच्या शरीरात चार गोळ्या निघाल्याचा इंग्लंडचा अहवाल आहे. मग उरलेल्या दोन गोळ्या कोणी झाडल्या होत्या, असा सवालही डॉ. स्वामी यांनी उपस्थित केला.
भारतीय संस्कृती जगात सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा करताना ते म्हणाले, बाहेरून आलेल्या पारशी, यहुदी लोकांनी भारताला आपले मानले. त्यामुळे त्यांचा कोणी द्वेष केला नाही. येथून स्वदेशात परतलेल्या लोकांनी ‘शोषण न करणारा एकमेव देश’ असा भारताचा गौरव केला; मात्र याच देशातील हिंदूंवर असहिष्णुतेचा आरोप केला जात आहे.व्याख्यानात बोलताना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी. समवेत रमेश जुन्नरे, प्रा. विलास औरंगाबादकर, मिलिंद जहागिरदार,
अॅड. बापूसाहेब आकूत, डॉ. विनायक गोविलकर.