मनाची कवाडे उघडा, साचेबद्धतेतून बाहेर पडा
By Admin | Updated: October 18, 2015 23:47 IST2015-10-18T23:43:11+5:302015-10-18T23:47:39+5:30
विद्यागौरी टिळक : जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन

मनाची कवाडे उघडा, साचेबद्धतेतून बाहेर पडा
नाशिक : ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी मनाची कवाडे उघडत पूर्वग्रहदूषित, परंपरागत गोष्टींना छेद दिला. जाती या माणसाने तयार केल्या असल्याचे लक्षात घेत त्यांनी माणूसपण महत्त्वाचे मानले. सध्यादेखील समाज ठराविक कप्प्यांत अडकत चालला असून, त्याने लक्ष्मीबार्इंना समोर ठेवून या साचेबद्धतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४८व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, वासुदेव दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. डॉ. टिळक यांनी भाषणातून आपल्या पणजी लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लक्ष्मीबार्इंकडे तटस्थतेने पाहताना व त्यांचे ‘स्मृतिचित्रे’ वाचताना अनेक नव्या गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींना ना. वा. टिळक जबाबदार नव्हते. लक्ष्मीबार्इंकडे स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी होती. त्यांनी अनेक अंधश्रद्धा साफ धुडकावल्या. प्रा. डॉ. टिळक यांनी लक्ष्मीबार्इंच्या आयुष्यातील अनेक प्रसंंगांचे दाखले देत त्यांचे पुरोगामित्व पटवून दिले. लक्ष्मीबार्इंना अनेकांनी हट्टी म्हटले आहे; पण तसे होण्याची वेळ त्यांच्यावर का आली, याचाही विचार व्हावा.
प्रारंभी पतीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला कडाडून विरोध करणाऱ्या लक्ष्मीबार्इंनी नंतर मनमोकळे धोरण अवलंबले. माणूस असणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मानत त्यांनी मनाची कवाडे उघडून स्वत:ला तपासण्याची संधी घेतली. ओळखही नसलेल्या रुग्णांची सेवा करणे, अगदी प्रेते उचलायलाही पदर खोचून उभे राहणे, यातून हेच दिसून येते. आपल्याकडच्या शुचिर्भूततेच्या, भेदाच्या कल्पनांतून त्या बाहेर पडल्या आणि मनाला योग्य वाटेल तेच केले, हे आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. किशोर पाठक यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)