२५ वर्षांपासून बंद असलेला कानमंडाळे-धोडंबे रस्ता खुला
By Admin | Updated: January 4, 2016 23:42 IST2016-01-04T23:06:34+5:302016-01-04T23:42:40+5:30
लोकसहभाग : तीन किमीचा फेरा वाचणार

२५ वर्षांपासून बंद असलेला कानमंडाळे-धोडंबे रस्ता खुला
वडनेरभैरव : गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेला कानमंडाळे-धोडंबे रस्ता प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार माणिक अहेर यांच्या उपस्थितीत लोकसहभागातून खुला करण्यात आला.
शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या वादातून सुमारे
२५ वर्षांपासून अतिक्रमित असलेला रस्ता खुला करण्यात आला.
१५ फूट रुंद व रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोन फूट गटार असा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खुला करण्यात आला.
धोडंबे-कानमंडाळे डांबरी रस्त्याला जोडणारा हा शिवरस्ता खुला झाल्याने त्याचा दोन्ही गावातील शेतकरी व नागरिकांना फायदा होणार आहे. पिंपळगाव, वणी येथे शेतमालाची वाहतूक करताना कानमंडाळे गावातून जावे लागत होते.
मात्र हा रस्ता खुला झाल्याने आता तीन किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार असून, शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तहसीलदार माणिक अहेर यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार आर. एम. वाघ, वडनेरभैरवचे मंडल अधिकारी व्ही. वाय. भंडारी, धोडंबेचे तलाठी एस. एम. पगार, सरपंच संदीप काळे, उपसरपंच पोपट उशीर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर पवार आदिंसह धोडंबे, कानमंडाळे येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)