ओतूरला पारा ४० अंशावर

By Admin | Updated: April 22, 2016 01:17 IST2016-04-22T01:14:38+5:302016-04-22T01:17:48+5:30

उकाड्याने नागरिक हैराण : पांगरी परिसरात उन्हाची तीव्रता वाढली

Opal to mercury at 40 degrees | ओतूरला पारा ४० अंशावर

ओतूरला पारा ४० अंशावर

पांगरी/ओतूर : परिसरात दिवसेंदिवस उन्हाळी तीव्रता वाढत असून, बुधवारी दुपारी पारा ४० डिग्री अंशावर पोहोचला. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत तसेच सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी परिसरात उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. उन्हाच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीत विश्रांती घेण्यास ग्रामस्थांकडून पसंती दिली जात
आहे.
होळी पौर्णिमेनंतर थंडी कमी होऊन उन्हाळ्यास सुरुवात होते. मात्र, यावर्षी एकदम तपमान वाढल्यामुळे उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चटका देणारे ऊन असल्याने ग्रामस्थ उन्हात जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे दुपारी सर्वत्र शुकशुकाट जाणवतो. दिवसेंदिवस तपमान वाढत असल्याने उर्वरित उन्हाळा कसा जाणार या विचारानेच अंगाची काहिली होत आहे. पांगरी परिसरात गेल्या ५ ते ६ वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडला नसल्याने विहीर, पाझर तलाव कोरडे पडले आहेत. वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना टॅँकरद्वारे तर गावातील नागरिकांची तहान फक्त मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर भागविण्यात येते. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुठेही हिरवा चारा नसल्याने पाटाखालील गावांमध्ये जाऊन चारा विकत आणावा लागत आहे. वैरणीसह पिण्यासाठी पाणीही विकत घेऊन जनावरे जगवण्याची वेळ पशूपालकांवर आल्याने दूध उत्पादनात घट दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Opal to mercury at 40 degrees