एकच ध्यास ‘गेटिंग टू झिरो’
By Admin | Updated: December 1, 2015 22:40 IST2015-12-01T22:39:53+5:302015-12-01T22:40:47+5:30
एड्स निर्मूलन दिन : विविध स्पर्धांचे आयोजन; सामाजिक संस्थांचा सहभाग

एकच ध्यास ‘गेटिंग टू झिरो’
नाशिक : तुमचे ज्ञान हीच तुमची शक्ती, किप सेफ कॅरी वन, सुरक्षा जीवन का अर्थ हैं, सुरक्षा के बीना जीवन व्यर्थ हैं, धैर्य हा विश्वास सामर्थ्य हीच आशा, एकच ध्यास गेटिंग टू झिरो अशा विविध प्रबोधनात्मक घोषणा देत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या एचआयव्ही-एड्स जनजागृती फेरीने नाशिककरांचे लक्ष वेधले.
जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या औचित्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीने राज्य शासनाच्या एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने जनजागृतीपर उपक्रमाचा भाग म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली होती. या जनजागृती फेरीला जिल्हा रुग्णालयापासून महापौर अशोक मुर्तडक यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. तत्पूर्वी आकाशात रेड रिबन लावलेले फुगे सोडण्यात आले. तसेच एड्सपासून सुरक्षित राहण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी उपसंचालक डॉ. सुनील पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गजानन होले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, एआरटी केंद्रप्रमुख डॉ. सुनील ठाकूर आदि उपस्थित
होते.
एड्समुक्त महाराष्ट्रासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी एचआयव्ही-एड्सची माहिती करून घेत ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा. ‘गेटिंग टू झिरो’ या घोषवाक्यानुसार नवीन एचआयव्ही संक्रमण, भेदभाव आणि एचआयव्ही बाधितांचे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र तरुणांनीदेखील एचआयव्ही, एड्स नियंत्रणासाठी सुरक्षेबाबतच्या माहितीचा प्रचार-प्रसार करण्यावर भर द्यावा, असे जगदाळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
त्र्यंबक नाका, सीबीएस, शालिमार चौक, नेहरू उद्यानमार्गे एमजी रोडवरून मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून त्र्यंबक नाकामार्गे जिल्हा रुग्णालयात प्रभात फेरी पोहोचली. ‘पडसाद’च्या स्वयंसेवकांनी एड्स जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण केले.