स्टेट बँक अभोणा शाखेत फक्त दोन कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 00:07 IST2020-11-02T21:44:23+5:302020-11-03T00:07:20+5:30
अभोणा : शहरासह पश्चिम पट्ट्यातील सुमारे ८० गावांच्या सर्वसामान्य, शेतकरी, व्यापारी, चाकरमाने, विद्यार्थी आदी हजारो ग्राहकांना आर्थिक सेवा देणाऱ्या येथील शाखेत पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने ग्राहकांचे कोणतेही व्यवहार वेळवर पूर्ण होत नसल्याने एकाच कामासाठी दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

स्टेट बँक अभोणा शाखेत फक्त दोन कर्मचारी
अभोणा : शहरासह पश्चिम पट्ट्यातील सुमारे ८० गावांच्या सर्वसामान्य, शेतकरी, व्यापारी, चाकरमाने, विद्यार्थी आदी हजारो ग्राहकांना आर्थिक सेवा देणाऱ्या येथील शाखेत पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने ग्राहकांचे कोणतेही व्यवहार वेळवर पूर्ण होत नसल्याने एकाच कामासाठी दोन-तीन दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे.
स्टेट बँकेच्या अभोणा शाखेत किमान सहा कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या येथे एक शाखा व्यवस्थापक व एक सहायक यांनाच कारभाराचा गाडा ओढावा लागत आहे. पश्चिम पट्ट्यात गुजरात राज्याच्या सीमेपर्यंत एकमेव स्टेट बँकेची शाखा अभोणा येथे असून, सुरगाणा तालुक्यातील काही गावेही या शाखेला जोडली आहेत.
सुमारे ३० किलोमीटरच्या परिघातील ग्राहकांना पैसे काढण्याबरोबरच अन्य बँकिंग व्यवहारासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. असे असले तरी वेळेवर काम होईलच याचीही शास्वती नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून येथे स्वतंत्र शेतकी अधिकारीच नसल्याने केंद्र तसेच राज्य शासनाच्या शेतीविषयक विविध योजना राबविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांनी वारंवार सूचना करूनही विभागीय व्यवस्थापनाकडून नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही.
अभोणा मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याने व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, उपबाजारात कांदा खरेदी व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना बँकिंग व्यवहार करताना तासन्तास तिष्टत रहावे लागते.
येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे अनेक कांदा व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांना अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे बँकिंग व्यवहार करताना अडचणी येत आहेत. वेळेवर आर्थिक व्यवहार न झाल्याने संपूर्ण बाजारपेठेवर याचा परिणाम होत आहे.
- मनोहर पवार, अध्यक्ष, कांदा व्यापारी असोसिएशन, अभोणा
फक्त दोनच कर्मचारी असल्याने संपूर्ण व्यवहार सांभाळताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी विनंती केली आहे. ग्राहकांना तिष्ठत ठेवणे क्लेशदायक वाटते.
- संदीप पाटील, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक, शाखा अभोणा (फोटो ०२ अभोणा १, २)