घोटीच्या ई-टोल सेवेचा अवघ्या वीस दिवसातच बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:04 IST2016-05-30T22:30:47+5:302016-05-31T00:04:41+5:30
लेन कायम बंद : अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा केवळ उरली नावापुरती; वाहनधारकांमध्ये अनुत्साह

घोटीच्या ई-टोल सेवेचा अवघ्या वीस दिवसातच बोजवारा
घोटी : टोल नाक्यावरील लेनमध्ये तासन्तास रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुंबई-आग्रा महामार्गावर पडघे ते धुळ्यापर्यंतच्या पाचही टोल नाक्यावर वीस दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात शुभारंभ झालेल्या ई-टोल सेवेचा अवघ्या वीसच दिवसात बोजवारा उडाला आहे.
या सेवेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा नामधारी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घोटी टोल नाक्यावर असणाऱ्या दहा लेनपैकी दोन लेन या सेवेसाठी वापरात येत असल्याने या दोन्ही लेन ई-टोल वाहनाच्या प्रतीक्षेत कायम बंद राहात असल्याने इतर लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीची कोंडी होत आहे. टोल नाक्यावर पथकर भरताना वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहनधारकाला टोलनाक्यावरून विनाअडथळा प्रवास व्हावा या उद्देशाने मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वच टोल नाक्यावर ९ मेपासून ई-टोल सेवेचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला होता. या सेवेचे उद्घाटन घोटी टोल नाक्यावर महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक पी.जी. खोडस्कर यांच्या हस्ते दिमाखात झाले होते.
या सेवेला अवघे वीस दिवस उलटत नाही तोच या सेवेचा लाभ घेण्यासाठी अपेक्षित ग्राहक मिळत नसल्याने ही सेवा काही दिवसातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांना आवश्यक असणारी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने या सेवेचा लाभ घेण्यासाठी वाहनधारक उत्साही नसल्याचे समजते. (वार्ताहर)