२४ पैकी केवळ ५ प्रकल्प कार्यान्वित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:55+5:302021-09-13T04:14:55+5:30

नाशिक : जुलैअखेरपर्यंत पूर्णत्वाची मुदत दिलेल्या २४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत केवळ पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित ...

Only 5 out of 24 projects implemented! | २४ पैकी केवळ ५ प्रकल्प कार्यान्वित !

२४ पैकी केवळ ५ प्रकल्प कार्यान्वित !

नाशिक : जुलैअखेरपर्यंत पूर्णत्वाची मुदत दिलेल्या २४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत केवळ पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पालकमंत्र्यांनी रविवारच्या आढावा बैठकीत या बाबीची दखल घेत सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, येत्या आठवड्यात १० प्रकल्पांचे काम पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात २४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे. कोरोनाविषयक उपाययोजनांसाठी आतापर्यंत ५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीसाठी साधारण एक हजार नवीन बेड्स वाढविण्यात आले असून, आजच्या स्थितीला ९७ टक्के बेडस शिल्लक आहेत. पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेचा अभ्यास करता ऑक्सिजन हा सर्वांत महत्त्वपूर्ण घटक असल्याचे निदर्शनास आल्याने ऑक्सिजन निर्मितीमध्ये जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी तातडीने ते प्रकल्प पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, जिल्ह्यात आतापर्यंत पाच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, उर्वरित १९ ऑक्सिजन प्रकल्पांचे काम अद्यापही सुरूच आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स, ऑक्सिजन सिलिंडर, बेडस तसेच बालरुग्णांसाठी टास्क फोर्स तयार करून पूर्व तयारी करण्यात आली आहे. गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी ज्यांना घरी राहून उपचार घेणे शक्य असून, तेथे आवश्यक सर्व व्यवस्था आहे, अशा रुग्णांना घरीच उपचार देण्यासाठी नियोजन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांची घरी व्यवस्था होणार नाही अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठीच्या सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

इन्फो

१९ पैकी १० प्रकल्प पुढील आठवड्यात पूर्ण

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी १९ पैकी १० प्रकल्प पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, मुळात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याने या सर्व प्रकल्पांचे कामकाज जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू व्हायला हवे होते. मात्र, आता सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरही अजून दोन तृतीयांशहून अधिक प्रकल्प अपूर्ण राहणे संकटात टाकणारे ठरू शकते.

कोट

जिल्ह्यातील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास करता ऑक्सिजन हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचे निदर्शनास आले आहे. तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही तिप्पट मोठी आली तरी कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जिल्ह्यात ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन जिल्हा ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या कार्यवाहीला गती देण्याचे आदेश पालकमंत्री भुजबळ यांच्याकडून देण्यात आले आहेत.

Web Title: Only 5 out of 24 projects implemented!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.