भोजापूर धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: November 1, 2015 23:52 IST2015-11-01T23:47:04+5:302015-11-01T23:52:45+5:30
टंचाईचे संकेत : शिल्लक जलसाठा टिकविण्याचेच आव्हान

भोजापूर धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात आॅक्टोबरअखेर केवळ ४५ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा संपला तरी धरण पूर्ण क्षमतेने न भरण्याचा प्रकार भोजापूरच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच घडला आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता धरणातील पाण्याच्या योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. यावर्षी जलसाठा राखून ठेवण्याचे पाटबंधारे विभाग व प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे.
सिन्नर तालुक्यात गेल्या ४-५ वर्षांपासून सलग समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे. भोजापूर धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असताना धरणात सध्या केवळ १६० दशलक्ष घनफूट (४५ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. भोजापूर धरण दरवर्षी आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पूर्ण क्षमतेने भरत असते. परंतु यावर्षी पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाला नसल्याने आॅक्टोबर महिना संपून गेल्यानंतरही धरण अर्धेच भरले आहे. तीन वेळा धरणात पाण्याची आवक सुरू झाल्यानंतर पाऊस थांबल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.
नांदूरशिंगोटे व भोजापूर खोरे परिसर हा संपूर्ण धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे खरिपासह रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतीव्यवसाय संकटात सापडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने अन्नधान्याच्या व भाजी-पाल्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी, नद्या-नाले, बंधारे, पाझर तलाव, केटीवेअर कोरडेठाक पडले आहेत. वाड्या-वस्त्यांवर व जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर बनणार आहे. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वपूर्ण होणार असल्याने परिसराचे भवितव्य भोजापूर धरणातील शिल्लक पाणीसाठ्यावर अवलंबून राहणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाला आत्तापासूनच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. आगामी आठ महिन्यांच्या काळात पाणीसाठा अबाधीत राखण्याची मोठी जबाबदारी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला पेलावी लागणार आहे. आजमितीला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याचे चित्र
आहे. याशिवाय धरणातील मृतसाठा, उपयुक्त पाणीसाठा, बाष्पीभवन, पाण्याची गळती, जमिनीतील पाण्याचा पाझर, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवानगी घेतलेल्या लिफ्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात धरणामध्ये किती पाणीसाठा शिल्लक राहील असाही प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यकाळात पाटबंधारे विभाग व प्रशासनापुढे धरणातील पाणीसाठा टिकवण्याचे आव्हान आहे. (वार्ताहर)
रब्बीच्या आशा धूसर
नांदूरशिंगोटे परिसरात यावर्षीही पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या चार वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. धरणाच्या आवर्तनावरच रब्बी हंगामाची तयारी शेतकरीवर्ग करत असतो. परंतु यावर्षी धरणात जेमतेम ४५ टक्के पाणीसाठा असताना, दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. पाण्याचा अपव्यय होण्यापेक्षा परिसरातील पाझर तलाव व बंधार्याला सोडल्यास परिसरातील शेतकर्यांना त्याचा लाभ होणार आहे. तथापि, यंदा धरणातच अत्यल्प जलसाठा असल्याने आवर्तन सुटण्याची शाश्वती नसल्याने खरिपापाठोपाठ रब्बीच्याही आशा धूसर झाल्या आहेत.