पाणीपट्टी आटली, अवघे १४ टक्केच मिळाली रक्कम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:55+5:302021-05-30T04:12:55+5:30
नाशिक : महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रुपयांपैकी ...

पाणीपट्टी आटली, अवघे १४ टक्केच मिळाली रक्कम!
नाशिक : महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टीपाठोपाठ पाणीपट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रुपयांपैकी अवघे ३ कोटी ७० लाख रुपये गेल्या दोन महिन्यांत जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यातच सध्या काेेरोना संकट असल्याने कारवाईबाबत देखील महापालिकेचे हात बांधलेले आहेत. नाशिक महापालिकेची घरपट्टीतील वाढ शंभर कोटी रुपये ओलांडून गेली असली तरी पाणीपट्टी मात्र ‘जैसे थे’ आहे. गेल्या वर्षभरापासून घरपट्टीत अडचणी येत असल्या तरी महापालिका अभय योजना तसेच अन्य उपाययोजनांच्या माध्यमातून वसुली वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. एप्रिल महिन्यात घरपट्टी भरल्यास पाच टक्के सूट देण्याची योजना मेअखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, पाणीपट्टीची स्थिती बिकट आहे. त्याचा परिणाम गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जाणवत आहे. नाशिक शहरात १ लाख ९९ हजार ६८६ नळ जोडण्या आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १५३ कोटी ५३ लाख रुपयांच्या घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात जेमतेम ३२ टक्के पट्टीच वसूल झाली होती.
महापालिकेला यंदाच्या वर्षी सारे काही सुरळीत होईल, असे वाटत असतानाच मात्र पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट उद्भवले. त्यामुळे १ एप्रिल २१ ते ३१ मार्च २०२२ या कालवधीत ६५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ ३ कोटी ७० लाख रुपये वसुल झाले आहेत. यात सातपूर विभागात २४ लाख ५४ हजार, पंचवटीत ९३ लाख १५ हजार, सिडको विभागात ७५ लाख ७६ हजार, नाशिक रोड विभागात एक कोटी, नाशिक पश्चिम २० लाख ७४, तर नाशिक पूर्व विभागात २० लाख १४ याप्रमाणे रकमेचा समावेश आहे.