राष्ट्र सेवा दल वाहणार ऑनलाईन श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:43+5:302021-05-01T04:14:43+5:30
कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित ...

राष्ट्र सेवा दल वाहणार ऑनलाईन श्रद्धांजली
कोरोना महामारी म्हणजे भारताच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात उद्ध्वस्तकारक आपत्ती आहे. आजपर्यंत या विषाणू संसर्गाने जवळजवळ दोन कोटी नागरिकांना बाधित केले आहे, तर दरदिवशी सुमारे चार लाख नवे संसर्गित रुग्ण आढळत आहेत. मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशा नव्या बाधित रुग्णांची रोजची संख्या सात-आठ लाखापर्यंत वाढण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या साथीत बळी पडलेल्या नागरिकांची संख्या खूप अधिक आहे. कोरोना साथीत विविध प्रकारे बळी ठरलेल्या नागरिकांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभांचे आयोजन केले जाणार आहे. या ऑनलाईन श्रद्धांजली सभांमध्ये धैर्य, एकजूट, आशा, स्वातंत्र्य आणि समानता यांचे निदर्शक असे पाच दिवे किंवा मेणबत्त्या प्रज्वलित केल्या जातील. तसेच छोटेखानी भाषणे होतील. ७ मे ते ४ जून अशा पाच आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता ही सभा होईल. तर एकजूट, आशा आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी शुक्रवार दि. ४ जून रोजी शेकडो राष्ट्र सेवादल सदस्य एक दिवसाचा उपवास करणार आहेत.