फी वसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण ‘ऑफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:42+5:302021-06-22T04:10:42+5:30
विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बंद झालेल्या ऑनलाइन शिक्षणाची कवाडे खुली करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली ...

फी वसुलीसाठी ऑनलाइन शिक्षण ‘ऑफ’
विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बंद झालेल्या ऑनलाइन शिक्षणाची कवाडे खुली करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली होती; पण निवेदन देऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने हजारो विद्यार्थी आजही ऑनलाइन शिक्षणप्रणालीपासून वंचित राहत असल्याचे बागलाण तालुक्यात पाहावयास मिळत आहे. शासनाकडून कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनस्तरावरून अनेक योजना राबविल्या जात आहेत; पण बागलाण तालुक्यात उलटे चित्र दिसून येत आहे. चालू शैक्षणिक सत्रात पालकांच्या संमतीने पालक समितीची स्थापना करून फी सवलतीचा अधिकार संबंधित समितीला देऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे. पण स्थानिक प्रशासन पालकांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा दाखवत असल्याने फी वसुलीसाठी अडचणी येत असून, दोन्हीही आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने गेल्या वर्षभरात फी वसुली कळीचा मुद्दा बनला आहे.
इन्फो
शाळा प्रशासन निर्णयावर ठाम
बागलाण तालुक्यातील खासगी इंग्रजी शाळांनी चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारणीचा तगादा लावला आहे. फी वसुलीबाबत शाळा प्रशासन ठाम आहे. शैक्षणिक शुल्क न भरल्यामुळे संस्थेकडून सुरू करण्यात आलेले ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. चालू सत्रातील व मागील संपूर्ण फी भरली नाही तर ऑनलाइन वर्गांना मुकावे लागेल, असा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
कोट...
शाळा प्रशासनाने परत एकदा विद्यार्थ्यांना वेठीस धरून फी वसुलीचा मुद्दा पुढे करत चालू शैक्षणिक सत्रात ऑनलाइन क्लासेस बंद केले आहेत. याबाबत पालक समितीची स्थापना करून तोडगा काढण्यासाठी आम्ही गटशिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिली आहेत; पण त्यांच्याकडून आमच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा दाखविण्याचा आल्या आहेत.
- दिनेश भांगडिया, पालक