‘सेट’साठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST2021-05-18T04:15:45+5:302021-05-18T04:15:45+5:30
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापकपदाकरिता घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या (एमएच-सेट) तारखा घोषित झाल्या ...

‘सेट’साठी ऑनलाइन अर्जप्रक्रियेस सुरुवात
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापकपदाकरिता घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या (एमएच-सेट) तारखा घोषित झाल्या असून, महाराष्ट्र व गोवा राज्यात २६ सप्टेंबरला ही सेट परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि.१७) पासून सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवसापासूनच सेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, टाळेबंदीमुळे शहरासह जिल्हाभरातील सायबर कॅफे बंद असल्याने इच्छुकांना आपल्या मोबाइल, टॅब व संगणकावरून अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
सहायक प्राध्यापक २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा पुणे विद्यापीठाने केली असून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना १० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. निर्धारित शुल्क ऑनलाइन स्वरूपातच भरायचा असून, त्यासाठीदेखील १० जूनपर्यंत अंतिम मुदत असणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ११ ते १९ जून या कालावधीत संधी दिली जाणार असून, परीक्षार्थी उमेदवारांना १६ सप्टेंबरला परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे, तर सध्याच्या वेळापत्रकानुसार २६ सप्टेंबरला ही परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाने केलेली आहे. दरम्यान, या परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न सेट परीक्षेत विचारले जात असतात. शंभर गुणांसाठी होणाऱ्या पेपर क्रमांक एकमध्ये ५० प्रश्न विचारले जातात. एक तासाचा कालावधी या पेपरसाठी असतो, तर पेपर क्रमांक दोन हा संबंधित विषयाचा असतो व त्यास २०० गुण असतात. पेपर दोनकरिता दोन तासांचा अवधी असतो.