कांद्याची विक्र मी आवक
By Admin | Updated: October 22, 2016 00:48 IST2016-10-22T00:46:43+5:302016-10-22T00:48:08+5:30
सटाणा, नामपूर : बाजार समितीमध्ये ९२५ रु पये क्विंटल भाव

कांद्याची विक्र मी आवक
सटाणा : येथील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज प्रत्येकी सुमारे १९ हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. ९२५ रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव कांद्याला मिळाला, अशी माहिती सटाणा बाजार समितीचे सभापती रमेश देवरे व नामपूर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कापडणीस यांनी दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत लिलावाची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मजूर टंचाई, माथाडी कामगार यांचा मेळावा, आर्थिक टंचाई आदि बाबींमुळे सलग चार दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी शुक्रवारीही कांदा विक्रीसाठी आणल्याने बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आजही कांद्याचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला. येत्या मंगळवारपासून (दि.२५) कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होतील. बंद काळात शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे. दिवाळीनंतर कांद्याच्या दरात सुधारणा होतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कांद्याला कमीत कमी २०० रुपये, तर सरासरी ६५० रुपये असा भाव होता. कांद्याची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव भास्करराव तांबे, अरुण अहिरे यांनी केले आहे. (वार्ताहर)