कांदा गडगडला

By Admin | Updated: January 2, 2017 23:12 IST2017-01-02T23:12:38+5:302017-01-02T23:12:56+5:30

येवला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

Onion was scorched | कांदा गडगडला

कांदा गडगडला

येवला : शेतमालाला सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेती आणि शेतकऱ्याला अवकळा आली आहे. याचा निषेध करून, उत्पादन खर्चावर आधारित कांद्याला १५०० रु पये हमीभाव देण्यात यावा आणि  उत्पादन अधिक असल्याने निर्यात वाढवावी यासह शेतकरीहिताच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येवला-मनमाड राज्य महामार्गावर येवला कृषी
उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी दुपारी १ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार एस. ए. पठारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. दरम्यान, या रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास निंबाळकर यांच्यासह पोलीस पथकाने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन नायब तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.  कांद्याच्या घसरत असलेल्या भावाबाबत चिंता व्यक्त करून सोमवारी दुपारी रास्ता रोको करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. कांद्याला हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर येवला- मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले.  सरकारच्या आडमुठे धोरणामुळे शेती आणि शेतकऱ्याला अवकळा आली आहे. हातात काही मिळाले नाही. परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात निसर्गाने शेतकऱ्यांवर
मोठी कृपा केली आहे. कांदा   पिकाची उत्पादन क्षमताही वाढलेली आहे.  गेला तीन वर्षे लागोपाठ पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी आपले कर्ज फेडू शकला नाही. आज शेतकऱ्यांकडे पीक मुबलक आहे, परंतु सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे सर्वात जास्त अडचणीत शेतकरी सापडलेला आहे.  मार्केटमध्ये विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे २४ तासात संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे तसेच सन २०१४-१५ मधील कांदा चाळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, येवला तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोहित्र जळालेले असतील त्या ठिकाणच्या बिलाची मागणी न करता रोहित्र दुरुस्त करण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सरकारने टाकलेले निर्बंध उठवण्यात यावे, कांद्याला किफायतशीर भाव मिळावा आदि मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत.  निवेदनावर तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, सरचिटणीस रवींद्र तळेकर, बाबासाहेब पैठणकर, पप्पू  जानराव, गोरख हजारे, भाऊसाहेब गरुड आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)




 

Web Title: Onion was scorched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.