कांदा उत्पादक चिंतित
By Admin | Updated: May 20, 2016 00:25 IST2016-05-19T22:49:22+5:302016-05-20T00:25:15+5:30
भावात घसरण : उत्पादन खर्चही निघत नसल्याने हवालदिल

कांदा उत्पादक चिंतित
येवला : राज्यात कांद्याचे भाव पुन्हा एकदा गडगडले असून, कांदा भावात झालेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.
शासनाने तत्काळ उपाययोजना केली नाही तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहाणार नाही. येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली. आवक स्थिर असून, बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रतिक्विंटल होते. सरासरी ६०० रुपये क्विंटल भाव मिळाला.
गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला भाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले. गुरुवारी येवला कांदा बाजार आवारात २०० ते ८०० प्रतिक्विंटल भाव होते. प्रतिक्विंटल सरासरी ५५० रुपये क्विंटल भाव मिळाला. त्यामुळे उत्पादकांत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. कमालीच्या घसरलेल्या कांदा भावाने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांद्यासह आम्हालाही बुरे दिन आल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कृषी मूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पद्धती कांद्याच्या बाबत का मूग गिळून बसली आहे. कांदा उत्पादन खर्च फिटत नसताना शेतकऱ्यांना विकावा लागतो. याबाबत मात्र केंद्र शासन काहीच बोलत नाही. (वार्ताहर)