कांदा लिलावास अल्पप्रतिसाद
By Admin | Updated: July 26, 2016 23:56 IST2016-07-26T23:56:20+5:302016-07-26T23:56:20+5:30
पालकमंत्र्यांना साकडे : गुरुवारी मंत्रालयात बैठक

कांदा लिलावास अल्पप्रतिसाद
नाशिक : व्यापाऱ्यांनी कांदा व बटाटा विक्रीसाठी गोणी मार्केटची मागणी केल्याने शेतकऱ्यांनी त्यास अल्पप्रतिसाद दिल्याचे मंगळवारी चित्र होते. शेकडो ट्रॅक्टरची आवक होणाऱ्या जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मंगळवारी आवक घटल्याचे चित्र होते.
गोणीत भरून कांदा व बटाट्याची विक्री करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, यामुळे क्ंिवटलमागे शेतकऱ्यांना ७० ते ८० रुपयांचा खर्च पेलावा लागणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती केदा अहेर व भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी मंगळवारी (दि.२६) पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईला भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील कांदाप्रश्नी निर्माण झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ पणनमंत्री सुभाष देशमुख यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली. केदा अहेर व दादा जाधव यांनी पणनमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन कांदा गोणीत भरून विकण्यास शेतकऱ्यांना तसेच विविध संघटनांचा विरोध असून, याप्रकरणी सरकारने तत्काळ तोडगा न काढल्यास कांदा उत्पादकांचे नुकसान होणार असल्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी (दि.२८) दुपारी बारा वाजता यासंदर्भात जिल्ह्णातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक, कांदा-बटाटा व्यापारी यांची एकत्रिक बैठक बोलविण्याचे पणन विभागाला आदेश दिले. त्यामुळे गुरुवारी याप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या कक्षात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह कृषी राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते.(प्रतिनिधी)