कांदा लिलाव बंद पाडला
By Admin | Updated: February 9, 2016 22:31 IST2016-02-09T22:30:37+5:302016-02-09T22:31:33+5:30
शेतकऱ्यांमध्ये संताप : ४०० रुपयांनी घसरण

कांदा लिलाव बंद पाडला
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात ४०० रुपयांनी झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला ३०० पासून ७०० पर्यंत प्रतिक्व्ािंटल भाव पुकारला गेला. मागील आठवड्यात कांद्याला सरासरी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत होता. तीन दिवसातच कांद्याच्या भावात निम्म्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर दोन तास ठिय्या आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. कांद्याच्या उत्पादन शुल्कानुसार कांद्याला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून, मागील आठवड्यात कांद्याला १४०१ ते सरासरी ९०० पर्यंत बाजारभाव होता. आज रोजी कांद्याला ११०० ते सरासरी ७०० पर्यंत बाजारभाव निघाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून कांद्याला ट्रॅक्टर अथवा जीपगाडी यांचा लिलाव झाल्यानंतर घेईल त्याची आडत पद्धत चालू केली आहे. तीन वर्षे आधी शेतकरी हा आडतमध्ये ट्रॅक्टर अथवा जीपची नोंद
करीत असे. मात्र सध्या चालू असलेली घेईल त्याची आडत पद्धत बंद करून पूर्वीचीच पद्धत चालू करण्याची मागणी अशोक कुशारे (नांदूर), राहुल अहेर (वडाळी), संपत जाधव (बोलू), सोमनाथ नागरे (डोंगरगाव), आशुतोष अहेर (कळवण), धनंजय खंगाळ (वावी) आदि शेतकऱ्यांनी केली असून, जवळपास तीन तासानंतर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सोनशेठ भंडारी, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सचिव संजय पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू केला. मात्र बाजारभावात कुठलीही सुधारणा झाली नाही. (वार्ताहर)