गोणी पद्धतीनुसार कांदा लिलाव
By Admin | Updated: July 25, 2016 23:34 IST2016-07-25T23:28:17+5:302016-07-25T23:34:25+5:30
चांदवड : प्रायोगिक तत्त्वावर घेतला निर्णय

गोणी पद्धतीनुसार कांदा लिलाव
चांदवड : शासनाच्या नियमनमुक्ती अध्यादेशात फळे व भाजीपाल्याचे नियमन रद्द करण्याबरोबरच आत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदारांकडून घेण्याबाबतचे शासन निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीच्या आवारावरील अडते व खरेदीदार अनुज्ञप्तीधारक यांनी दि. ९ जुलै २०१६ पासून शेतमाल लिलाव बंद केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समितीतील व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याकरिता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.
परंतु जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे परवाने परत केले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार संपूर्णत: थांबलेले होते. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली असून, सदर उपसमिती जिल्ह्यातील बाजार समितीच्या अभ्यास करुन शेतकरी व संबधीत घटकांच्या भावना जाणून घेऊन शासनास दि. ५ आॅगस्ट १६ पावेतो अहवाल सादर करणार
आहेत. त्यानुसार चांदवड बाजार समितीचे आवारावर आज मंगळवार, दि. २६ जुलै १६ पासून सकाळी १० वाजता कांदा गोणी लिलाव सुरू होणार आहे.
त्याकरिता चांदवड बाजार समितीत कांदा विक्रीस आणतांना शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल गोणीत ४५ किलो समप्रमाणात भरुन मालाची निवड व प्रतवारी करुन विक्रीस आणावा तसेच चांदवड बाजार समितीत कांदा लिलावाची पध्दत बदलुन गोणी मार्केट सुरु होत आहे. त्याकरिता शेतकरी बांधवांनी गोणीत कांदा विक्रीस आणतांना आपल्या संपुर्ण शेती मालातील कोणत्याही गोणीचा लिलाव केल्यास त्याच गोणीसारखा संपुर्ण शेतीमाल राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी जेणेकरुन आपल्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल . असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर व संचालक मंडळाने केले आहे. ( वार्ताहर)