दोन गटात हाणामारीत एकाचा मृत्यू
By Admin | Updated: May 7, 2014 21:36 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T21:36:20+5:30
दहा जखमी; दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा

दोन गटात हाणामारीत एकाचा मृत्यू
दहा जखमी; दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा
ओझर टाऊनशिप : येथील टाऊनशिप वसाहतीलगत असलेल्या आंबेडकरनगरमध्ये मुलीच्या लग्नाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत दहा जण जखमी झाले असून, पैकी गंभीर जखमी झालेल्या एका जणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या हाणामारीत तलवारी, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांचा वापर करण्यात आला असून, या संदर्भात ओझर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सचिन दगू हिरे (२४) व त्याचा भाऊ सुनील दगू हिरे (३६) रा. आंबेडकरनगर, ओझर हे दोघे त्यांच्या मोटारसायकलने घरी जात असताना संतोष जयवंत जाधव, दौलत वामन जाधव, विनोद जयवंत जाधव, गौतम वामन जाधव, प्रकाश हिरामण आव्हाड, राहुल वामन जाधव, दीपक अशोक गांगुर्डे, रेखा प्रकाश आव्हाड भीमाबाई जयवंत जाधव व विनोद जाधव यांची पत्नी (सर्व रा. आंबेडकरनगर, ओझर) यांनी त्यांना रस्त्यात अडविले. यावेळी त्यांच्या हातात तलवारी, कोयता, विळे, लाकडी दांडे होते. हिरे बंधूंनी आम्हाला का अडविले, असे विचारले असता तुम्ही आमच्या मुलीबरोबर तुमचा भाऊ बाळकृष्ण याचे लग्न का करत नाही, यासाठी तुम्हीच कारणीभूत आहात, अशी कुरापत काढून त्यांच्या हातातील हत्यारांनी हिरे बंधूंच्या डोक्यावर व हातावर वार करून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या केदू दगू हिरे (२१) त्यांच्यावर वार केले. पैकी केदू हिरे व सुरेखा सुनील हिरे (३०) यांच्या डोक्यावर गंभीर वार बसला. ते गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस निरीक्षक सिद्धार्थ वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपटराव देवरे, एस.बी. उफाडे , हवालदार दीपक घोडे, अरुण शिंदे, पुंडलीक राऊत, संतोष घोडेराव, संदीप भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेऊन हाणामारीत जखमी झालेले सचिन हिरे, सुनील हिरे, केदू हिरे, सुरेखा हिरे, आशाबाई हिरे यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असताना केदू हिरे यांचा मृत्यू झाला. संदर्भात सचिन हिरे याने नोंदविलेल्या तक्रारीवरून ओझर पोलिसांनी संतोष जाधवसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संतोष जाधव, दौलत जाधव, राहुल जाधव, गौतम जाधव, प्रकाश आव्हाड, रेखा आव्हाड यांना अटक केली आहे.
दरम्यान, संतोष जाधव यानेही पोलिसांत तक्रार नोंदविली असून, तक्रारीत म्हटले आहे की, संतोष जाधव व त्यांचा मित्र राहुल जाधव हे बहीण रेखा आव्हाड यांच्या घरी जात असताना केदूा दगू हिरे, सचिन दगू हिरे, सुनील दगू हिरे, आशाबाई दगू हिरे व आशाबाईच्या दोन सुना हे हातात रॉड, तलवारी घेऊन हत्यारांनी मारहाण करून जखमी केले. त्यांनाही ओझर पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. या तक्रारीवरून ओझर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पाटील, उपअधीक्षक आटोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना व मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
बॉक्स :- या हाणामारीत मयत झालेला केदु हिरे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत प्रथम आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी हिरे कुटूंबीय व त्यांचे नातेवाईकांनी केली असता पोलीसांनी आरोपींना त्वरीत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. यासंदर्भात अधिक तपास पोलीस निरिक्षक सिद्धार्थ यांचेसह ओझर पोलीस करीत आहेत.