महापालिकेसाठी येणार एक सदस्यीय पद्धत

By Admin | Updated: September 23, 2015 00:27 IST2015-09-23T00:26:50+5:302015-09-23T00:27:29+5:30

जानेवारी १६ ची यादी ग्राह्य : नवीन मतदार नोंदणीची संधी

One-member method for municipal corporation | महापालिकेसाठी येणार एक सदस्यीय पद्धत

महापालिकेसाठी येणार एक सदस्यीय पद्धत

नाशिक : सन २०१६-१७ मध्ये होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१६ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्याच ग्राह्य धरण्यात येणार असून, महापालिका व नगरपालिका निवडणुकीसाठी द्विसदस्यीय पद्धती ऐवजी आता एक सदस्यीय पद्धत लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे येत्या ८ आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेच्या निमित्ताने निवडणूक इच्छुकांना चांगलीच संधी उपलब्ध झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाने ८ आॅक्टोबर ते १६ जानेवारी २०१६ या काळात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, २०१६-१७ या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी हीच अद्ययावत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१६ रोजी ज्या मतदाराचे वय १८ होईल असे नव मतदार मतदार नोंदणी करू शकतील. तत्पूर्वी ८ आॅक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यावर मतदारांकरवी हरकती वा सूचना मागविण्यात येणार आहे, त्यानंतर ११ व १८ आॅक्टोबर रोजी विशेष मतदार मोहीम राबविण्यात येऊन अंतिम मतदार यादी १६ जानेवारी २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे नगरपालिका, महापालिकेसाठी बहुुसदस्यीय पद्धतीऐवजी एक सदस्यीय पद्धत म्हणजेच एका वॉर्डातून एक सदस्य अशा पद्धतीने निवडणूक होणार आहे. त्यामुळे आॅक्टोबरपासून सुरू होणारी मतदार पुनरीक्षण मोहीम निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पथ्यावर पडणार असून, आपापल्या हक्काची मतदार नोंदणी करून घेण्याची आयतीच संधी प्राप्त झाली आहे. मंगळवारी या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विशेष मोहिमेच्या प्रचार व प्रसाराची सूचना केली. (प्रतिनिधी)

Web Title: One-member method for municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.