समर्थ फ्रेंड्स सर्कलतर्फे ‘एक मूठ धान्य’
By Admin | Updated: September 27, 2016 00:29 IST2016-09-27T00:28:52+5:302016-09-27T00:29:13+5:30
कळवण : कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना वाटप

समर्थ फ्रेंड्स सर्कलतर्फे ‘एक मूठ धान्य’
कळवण : येथील समर्थ फ्रेंड्स सर्कलतर्फे शहरात गणेशोत्सव कालावधीत ‘एक मूठ धान्य’ उपक्र म राबविण्यात आला. या उपक्र मात जमा झालेले धान्य कळवण तालुक्यातील कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
गणेशोत्सव काळात अनेक गणेश मंडळे लाईटिंग, देखावा, मिरवणूक, आतषबाजी आदिंवर हजारो, लाखो रुपये खर्च करतात; मात्र कळवण येथील समर्थ फ्रेंड्स सर्कलने या सर्व बाबींना फाटा देऊन कळवण शहरात गणेशोत्सव काळात गणेश मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शहरातील गणेश मंडळे व प्रतिष्ठित नागरिकांकडे जाऊन स्वेच्छेने धान्य भिक्षा देण्याचे आवाहन केले. त्यातून ८ क्विंटल गहू, ८ क्विंटल तांदूळ, २ क्विंटल बाजरी, २ डबे तेल, २० किलो डाळी, १० किलो चहा पावडर, ५० किलो साखर इत्यादि साहित्य जमा करण्यात आले. या सर्व जीवनावश्यक वस्तू कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या हस्ते कनाशी येथील वनवासी कल्याण आश्रमाला देण्यात आल्या. यावेळी अभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल फुला, सुनील चव्हाण, बबन पाटोळे, समर्थ फ्रेंड्स सर्कलचे स्वप्नील शिरोरे, सागर वाणी, पुष्कर वेढणे, रोहित महाले, मयूर अमृतकार, रोशन कोठावदे, हर्षल मालपुरे, उमेश मुसळे, सचिन गहिवाळ, कल्पेश पाखले, दामोदर अमृतकार, सुभाष देवघरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
सार्वजनिक उत्सव जरूर साजरे करावेत; मात्र यावेळी अनावश्यक खर्च टाळून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने शक्य तेवढी मदत समाजातील उपेक्षित व गरजू घटकांना करणे ही काळाची गरज आहे. असे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळ सस्थांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. - सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक, कळवण
मागील दोन वर्षांपूर्वी आपल्या समर्थ फ्रेंड सर्कलने असाच अभिनव उपक्र म राबविला होता. त्यावर्षी २५ क्विंटल धान्य जमा झाले. तसेच यावर्षीही जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व मोलाचे सहकार्य केले.
- स्वप्नील शिरोरे, समर्थ फ्रेंड सर्कल, कळवण