‘वसाका’ला मिळणार एक लाख मेट्रिक टन ऊस
By Admin | Updated: February 6, 2016 23:59 IST2016-02-06T23:58:47+5:302016-02-06T23:59:47+5:30
‘वसाका’ला मिळणार एक लाख मेट्रिक टन ऊस

‘वसाका’ला मिळणार एक लाख मेट्रिक टन ऊस
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला चालू गळीत हंगामासाठी बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून एक लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेऊ, अशी ग्वाही चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी शनिवारी पिलखोड, ता. चाळीसगाव येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात दिली. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तीन वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी उशिराने गळीत हंगाम सुरू झाल्याने वसाका कार्यक्षेत्राबरोबच कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिलखोड येथे ऊस उत्पादकांचा मेळावा घेण्यात आला. मागील काळात बेलगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर वसाकाचे तत्कालीन अध्यक्ष कै. डॉ. दौलतराव अहेर यांनी चाळीसगाव परिसरातील सर्व ऊस गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला उपलब्ध करून दिला आहे. त्याची जाणीव सर्वांना असल्याने परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी वसाकाला ऊस पुरवठा करण्याबाबत सहमत असून, वेळप्रसंगी स्वत:च्या खर्चाने वसाकाला ऊस पुरवठा करून देऊ, अशी ग्वाही आमदार उन्मेषदादा पाटील यांनी यावेळी दिली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार वसाका सर्व ऊस उत्पादकांना उसाचे बिल देण्यास कटिबद्ध असून, जे शेतकरी स्वखर्चाने ऊस पुरवठा करतील त्यांना ऊस वाहतुकीसह ऊस -तोडणीची रक्कमही तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी दिली. यावेळी वसाकाचे माजी संचालक संतोष मोरे, चाळीसगाव बाजार समितीचे संचालक महेंद्रसिंह पाटील, पिलखोडचे सरपंच दिगंबर पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)