एक लाख नागरिकांनी केले भारत मातेचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:21 IST2021-08-17T04:21:13+5:302021-08-17T04:21:13+5:30
नाशिक अभाविपच्यावतीने जिल्ह्यातील १४ हजार ६२० घरात भारत माता प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या अभियानांतर्गत घरांमधील एक ...

एक लाख नागरिकांनी केले भारत मातेचे पूजन
नाशिक अभाविपच्यावतीने जिल्ह्यातील १४ हजार ६२० घरात भारत माता प्रतिमा भेट स्वरूपात देण्यात आली. या अभियानांतर्गत घरांमधील एक लाख नागरिकांनी भारत मातेच्या प्रतिमा पूजनात सहभाग घेतला.
या अभियानाच्या माध्यमातून गाव, वस्ती, पाडा व कॉलनीत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्वाला तेवत ठेवत अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात अभाविपने केलेली आहे, असे प्रतिपादन अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे यांनी केले.
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील शंभर घरी संपर्क साधून भारत मातेची प्रतिमा व अभाविपचे माहिती पत्रक वाटप करून या अभियानाची माहिती सांगत घराघरातील नागरिकांना सामील करून घेतले. याशिवाय बस स्थानक, ट्रॅफिक सिग्नल, महाविद्यालये, कार्यालये, बाजारपेठा याठिकाणी प्रतिमांचे वाटप करून देशभक्तीपर वातावरण तयार केल्याचे महानगर मंत्री सिद्धेश खैरनार यांनी सांगितले. नाशिकमध्ये हे अभियान पन्नासपेक्षा अधिक गावात जाऊन अभाविपने राबवले. त्याचप्रमाणे या अभियानात ठिकठिकाणी तिरंगा फेरी, परिषद की पाठशाळा ठिकाणी ध्वजारोहण, ३३ चौकात भारत माता पूजन करण्यात आले, अशी माहिती अभियान प्रमुख श्रेयस पारनेरकर यांनी दिली.
छायाचित्र आर फोटोवर १६एबीव्हीपी