देवगाव : शिरवाडे फाटा पोमनर वस्तीनजीक फोर्ड फिएस्टा कार व मोटारसायकलच्या धडकेत वागदर्डी ता. चांदवड येथील लक्ष्मण गंगाधर मढे (३५) यांचा जागीच मृत्यू झाला.दि. २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एमएच १५, डीव्ही ०४५८ या हिरो होंडा मोटारसायकल वरून लक्ष्मण गंगाधर मढे (३५) व अनिकेत दत्तात्रय आवारे (१९) हे भरवसफाट्याकडे जात असताना दिलीप अशोक आहेर चासनळी यांच्या मालकीची फोर्ड फिएस्टा एमएच १७ एजे ५४ या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात लक्ष्मण मढे जागीच ठार झाले. अनिकेत तब्बल ३० फूट उडूनही दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने उकिरड्यावर पडला, यात त्याचा पाय मोडला. मोटारसायकलचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारार्थ चासनळी प्रा. आरोग्य केंद्रात पाठविले. घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना कळविताच पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, नाईक कैलास महाजन, एस.एस. इप्पर, पोलीस हवालदार मधुकर उंबरे, शिपाई दत्तात्रय कोळपे तातडीने घटनास्थळी हजर झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.मढे यांच्या पश्चात मुलगा व दोन मुली आहेत. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर वागदर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिरवाडेनजीक अपघातात एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST