कंटेनरखाली चिरडून गोंदे येथे एक ठार
By Admin | Updated: February 28, 2017 00:12 IST2017-02-28T00:12:39+5:302017-02-28T00:12:58+5:30
अपघात : एक कामगार गंभीर जखमी

कंटेनरखाली चिरडून गोंदे येथे एक ठार
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात कारखान्यात माल खाली करण्यासाठी आलेल्या कंटेनरने कारखान्याच्या बाहेर झोपलेल्या दोघा कामगारांना चिरडल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात एक कामगार जागीच ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात गोंदे-खंबाळे रस्त्यावर दक्षिण बाजूला श्री गणेश पॅकेजिंग नावाने कारखाना आहे. या कारखान्यातील दोघे कामगार रविवारी रात्री कारखान्याबाहेर मोकळ्या जागेत झोपले होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास कारखान्यात कंटेनर (क्र. एमएच १९ झेड ३१०८) माल घेऊन आला होता. कारखान्यात माल खाली केल्यानंतर कचरा टाकण्यासाठी तो जवळच कचरा डेपोकडे गेला होता. कारखान्याच्या बाहेर चंदन चव्हाण (१८) व राजन पवन चव्हाण हे दोघे झोपले होते. कारखान्याच्या बाहेर झोपलेले कामगार चालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे ते चिरडले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात चंदन चव्हाण (१८) हा जागी ठार झाला. अपघाताची माहिती समजल्यानंतर नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार एस. एस. चव्हाणके, डी. बी. दराडे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. (वार्ताहर)