कांद्याला शंभर रुपये सानुग्रह?
By Admin | Updated: August 26, 2016 01:00 IST2016-08-26T00:59:14+5:302016-08-26T01:00:15+5:30
राज्य सरकारचा प्रस्ताव : मंत्र्यांचे सूतोवाच

कांद्याला शंभर रुपये सानुग्रह?
नाशिक : कांद्याचे कोसळलेल्या दरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्व्ािंटल शंभर रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते, तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आल्याचे सूतोवाच पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्च कोसळलेले भाव पाहता, शंभर रुपयांना शेतकरी राजी होण्याची शक्यता कमीच आहे.
पुणे येथे बाजार समित्यांच्या प्रश्नावर झालेल्या बैठकीनंतर कांद्याच्या प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी नाशिकहून गेलेल्या बाजार समित्यांच्या संचालकांना कांद्याच्या परिस्थितीबाबत विचारणा केली, त्यावेळी कांद्याचे दर दिवसागणिक कोसळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, सरकारने दोन आठवड्यापूर्वी काही तरी योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केले असले तरी, त्यास विलंब होत आहे, परिणामी शेतकऱ्यांचा कांदा लिलावाअभावी सडू लागल्याचे सांगण्यात आले. सायखेडा बाजार समितीत पाच पैसे कांद्याला दर मिळाल्याची बाबही यावेळी चर्चिली गेली. त्यावर पणन मंत्र्यांनी १२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला कांद्याच्या प्रश्नावर राज्य सरकारने प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले.
गेल्या वेळी शासनाने प्रति क्विंटल शंभर रुपये अनुदान देण्यात आले होते, त्यामुळे सरकार यावेळीदेखील त्याचीच पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे, मात्र किमान दोनशे रुपये तरी दिले जावे व सरकारचा हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच जून महिन्यापासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला अशा सर्वांनाच त्याचा लाभ द्यावा, अशी मागणी राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे आदिंनी केली.