ब्रह्मगिरीसाठी एक कोटी
By Admin | Updated: August 1, 2015 23:46 IST2015-08-01T23:45:25+5:302015-08-01T23:46:37+5:30
वेळेत बचत : निम्मी कामे पूर्ण, उर्वरित होणार नोव्हेंबरपर्यंत पूर्ण

ब्रह्मगिरीसाठी एक कोटी
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने गोदावरीचे उगमस्थान असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतावर विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुसज्ज अशी रेलिंगची व तुटलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती माजी नगरसेवक गोविंदराव मुळे यांनी दिली.
यावर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ब्रह्मगिरीवर ४ कोटी २१ लाख रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पाऊस व मजुरांच्या अभावी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उर्वरित कामांसाठी शासनाने नव्याने एक कोटी दहा लाख रुपये मंजूर केले आहेत.
या विकासकामांमुळे ब्रह्मगिरीला जाण्याच्या-येण्याच्या वेळेत फरक पडला असून, पूर्वीच्या चार तासांचा कालावधी आता अडीच तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाविकही समाधान व्यक्त करीत आहे.
जानेवारी २०१३ पासून मंत्री, शासकीय अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वनविभागाने विविध विकासकामे सरकारला सूचविल्यानंतर शिखर समितीने कामांना मंजुरी दिली. त्या अंतर्गत ब्रह्मगिरी व परिसरात विविध विकासकामे करण्यात आली.
जुलै १४ ते जुलै १५ या कालावधीत ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी अॅँगल बसविणे, तुटलेल्या पायऱ्यांच्या जागी नवीन पायऱ्या बसविणे, आदि कामे पूर्ण करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना उर्वरित कामांचे निवेदन दिले असून, सर्वसाधारणपणे आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत ही कामे होणे अपेक्षित आहे.
मार्चपासून ब्रह्मगिरी, गंगाद्वार येथे भाविक मोठ्या संख्येने भेट देत असून अधिकमासारंभ, ध्वजारोहण, आषाढी एकादशी याप्रमुख दिवशी संख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मगिरीला भेट देण्यासाठी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या विकासकामांमुळे त्यांचा प्रवास सुखकर झाला असल्याचे दिसून येत आहे. कोणताही त्रास न होता भाविक गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत पोहचू शकत आहेत.
ब्रह्मगिरीच्या विकासकामांसाठी निधी प्राप्त करण्याकरिता वनाधिकारी अनिता पाटील, वनविभागाचे उपअधीक्षक नागनोर, जिल्हाधिकारी दीपेशसिंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील, कसबे, गावडे यांनी पाठपुरावा केला. (प्रतिनिधी)