दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणी
By Admin | Updated: July 26, 2016 22:40 IST2016-07-26T22:40:55+5:302016-07-26T22:40:55+5:30
दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणी

दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणी
दीड एकर शेतीचे नुकसान : अभियंत्यांची कानउघडणीनाशिक : साधारणत: वर्षभरापूर्वी झालेले जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या मडकेजाम येथील गावतळे अतिवृष्टीने फुटल्याने सुमारे दीड एकर शेतीचे नुकसान झाल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी प्रकाश वडजे यांच्याकडे केला. त्यानंतर वर्षभरात फुटलेल्या या गावतळ्याच्या कामाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना दिले.
मडकेजाम येथील शेतकरी गणपत वडजे, माधव वडजे, शरद वडजे यांच्या शेतात सन २०१४-१५ या वर्षात उर्वरित वैधानिक विकास महामंडळाच्या निधीतून १५ लाखांचे गावतळे मडकेजाम ग्रामपंचायतीने बांधले. ग्रामपंचायतीने या कामासाठी बोडके नामक ठेकेदाराला हे काम दिले होते. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हे गावतळे फुटून वडजे कुटुंबीयांच्या शेतातील टमाटे व अन्य पिकांचे नुकसान झाले. सुमारे दीड एकरवरील शेतीचे नुकसान झाले. तसेच वडजे कुटुंबीयांच्या घरापर्यंत या फुटलेल्या गावतळ्याचे पाणी पोहोचले. मंगळवारी (दि.२६) यासंदर्भात माधव वडजे यांनी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे तक्रार केली.
प्रकाश वडजे यांनी आपल्या गावात गावतळे फुटल्यानंतरही यंत्रणेने आपल्याला साधी माहिती दिलेली नाही, असे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना बोलावून स्पष्ट केले. त्याचवेळी दिंडोरीचे शाखा अभियंता आर. ए. कोळगे व प्रभारी उपअभियंता व्ही. के. सोनवणे यांना बोलावून कार्यकारी अभियंत्याला फुटलेल्या गावतळ्याची का कल्पना दिली नाही, यावरून त्यांची कानउघडणी केली. तसेच वर्षभरातच गावतळे फुटल्याने ते निकृष्ट असल्याचे स्पष्ट होते. या कामाची चौकशी करून तत्काळ अहवाल आपल्याकडे सादर करावा, असे आदेश दिले. त्यानंतर कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी सोनवणे व कोळगे यांना अहवाल पाठविला नसल्याबाबत कानउघडणी केली. (प्रतिनिधी)