पाणीपुरवठा योजनांसाठी दीड हजार कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:54+5:302021-06-29T04:11:54+5:30
नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील ...

पाणीपुरवठा योजनांसाठी दीड हजार कोटींचा प्रस्ताव
नाशिक जिल्ह्यातील १,९२२ गावांचा जलजीवन मिशन अंतर्गत साधारण १,५०० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचा कृती आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता देऊन सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनास सादर करण्यात आला आहे. प्रस्तुत पाणीपुरवठा योजनांची ‘अ’, ‘ब’ व नवीन पाणीपुरवठा योजना याप्रमाणे विगतवारी करण्यात आली असून, ‘अ’ प्रस्तावात जिल्ह्यातील ४२८ गावांच्या रुपये ९४.२० कोटी रकमेच्या योजनांचा समावेश असून, यामध्ये कार्यरत पाणीपुरवठा योजनांच्या नळजोडणी किंवा तत्सम कामे हाती घेण्यात येणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ‘ब’ प्रस्तावात नाशिक जिल्ह्यातील ५९७ गावांचा समावेश असून, त्यांचा अंदाजे रुपये २६१.२२ कोटी रकमेची अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्याबाबत प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या ५७२ गावांना रुपये ३४९.०२ कोटी रकमेच्या नव्याने पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे.
सदर प्रस्तावातील जलजीवन मिशन अंतर्गत १,५९७ गावांच्या पाणीपुरवठा योजनांची रुपये ७०४.४५ कोटी रकमेची कामे ही नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून, उर्वरित ३२५ गावांची रुपये ७४०.०० कोटी रकमेची कामे ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणेमार्फत राबविली जाणार आहेत, त्यामुळे या योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केली आहे.