नाशिक-पुणे महामार्गावर दीड तास वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या रांगा
By Admin | Updated: January 10, 2017 01:16 IST2017-01-10T01:05:17+5:302017-01-10T01:16:20+5:30
खोळंबा : दारणा नदीपुलावर खासगी बसचे टायर पंक्चर

नाशिक-पुणे महामार्गावर दीड तास वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या रांगा
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी येथील दारणा नदीपुलावर खासगी ट्रॅव्हलची बस सोमवारी रात्री पंक्चर झाल्याने नाशिकरोड-सिन्नर दरम्यानची वाहतूक जवळपास दीड तास खोळंबली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांब रांग लागली होती.
नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्सची बस सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चेहेडी येथील दारणा पुलावरच पंक्चर झाली. अगोदरच दारणा पूल वाहतुकीसाठी अरुंद ठरत असून, ट्रॅव्हल्सची बस पंक्चर झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या वाहनधारकांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात आपली वाहने पुढे हाकली. यामुळे नाशिक-सिन्नर दरम्यानची वाहतूक जवळपास दीड ते पावणेदोन तास ठप्प झाली होती. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांची लांबलचक रांग लागलेली होती. यामुळे प्रवासी प्रचंड हैराण होऊन गेले होते. खासगी वाहतूक व रिक्षामधून जाणाऱ्या प्रवाशांनी अखेर नाइलाजास्तव पायीपायीच आपला पुढचा प्रवास सुरू केला होता.
महामार्गावर शिंदे गावपासून सिन्नर फाट्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामध्ये दोन्ही बाजूला चार-पाच रुग्णवाहिकादेखील अडकल्या होत्या. (प्रतिनिधी)