ओमकारानंद यांच्या योगासनांनी वेधले लक्ष
By Admin | Updated: September 14, 2015 23:50 IST2015-09-14T23:50:18+5:302015-09-14T23:50:43+5:30
साधना : गांधी तलावावर भाविकांची गर्दी

ओमकारानंद यांच्या योगासनांनी वेधले लक्ष
नाशिक : वेळ संध्याकाळी सहा वाजेची. ठिकाण गांधी तलाव. गुजरातमधील बडोदा येथून कुंभनगरीत दाखल झालेले स्वामी ओमकारानंद सरस्वती महाराजांनी महापर्वणीच्या दुसऱ्या दिवशी गोदाघाटावरील गांधीतलावावर स्नानासाठी पोहचले. यावेळी या साधूमहाराजांनी स्नानापश्चात विविध योगासने करून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले.
महापर्वणी पार पडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी संपूर्ण रामकुंड परिसरासह साधुग्राम गजबजलेले होते. भाविकांची वर्दळ कायम असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, सूर्य मावळतीला असताना या साधूमहाराजांनी गांधी तलावात डुबकी मारली. स्नान आटोपल्यानंतर तत्काळ नदीकाठी आपले भगवे वस्त्र अंथरून योगसाधनेला प्रारंभ केला.
यावेळी त्यांनी कुक्कुटासन, ध्रुवासन, सूर्यासन यासारखे योगांचे विविध प्रकार करून आपल्या योगसाधनेने संपूर्ण गांधी तलाव, रामकुंड परिसरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची साधना बघण्यासाठी दशक्रिया विधी छत्रीपासून संपूर्ण रामकुंडाजवळील गंगागोदावरी मंदिराचा लहान पूल या भागात भाविक मोठ्या संख्येने त्यांची योगसाधना बघण्यासाठी जमा झाले होते. अनेकांनी त्यांच्या साधनेच्या छबी मोबाइलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या साधूमहाराजांच्या योगसाधनेने भाविकांना आश्चर्यचकित केले. (प्रतिनिधी)
गंगा-गोदावरीच्या पात्रात कुंभपर्वणी काळात स्नान केल्यानंतर गंगानदीच्या काठावर साठ वर्षे तपश्चर्या केल्याचे पुण्य लाभते. कुंभपर्वणीचे अनन्यसाधारण महत्त्व असून, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीपात्रात शाहीस्नान केले. त्यानंतर आज नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदापात्रात स्नान केले. भाविकांचा दोन्ही ठिकाणी लोटलेला जनसागर बघून अभुतपूर्व कुंभपर्वणी साजरी झाली.
- ओमकारानंद सरस्वती