गोदामाईची भरली ओटी !

By Admin | Updated: July 16, 2016 00:03 IST2016-07-16T00:03:08+5:302016-07-16T00:03:34+5:30

धरणात वाढला पाणीसाठा : महापौरांच्या हस्ते जलपूजन

Omega full of godown! | गोदामाईची भरली ओटी !

गोदामाईची भरली ओटी !

 नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच ६६ टक्क्यांवर जाऊन पोहोचल्याने माहेरवाशीण बनून आलेल्या गोदामाईची महापालिकेच्या वतीने विधीवत साडीचोळी देऊन ओटी भरण्यात आली. याचवेळी महापौर अशोक मुर्तडक यांनी जलपूजन करत गोदामाईने अखंड कृपादृष्टी राहू द्यावी, अशी प्रार्थना केली.
संपूर्ण शहराची पाण्याची गरज भागविणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा १५ टक्क्यांवर येऊन पोहोचला असताना वरुणराजा हुलकावणी देत असल्याने नाशिककरांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, गेल्या रविवारी (दि.१०) शहराला जोरदार पावसाने सलामी दिली आणि दोन दिवसातच धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. दि. १५ जुलैअखेर धरणातील पाणीसाठा ६६.१२ टक्के इतका झालेला आहे. धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याने महापालिकेने दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली आणि पूर्वीप्रमाणेच दोन वेळ पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय येत्या २० जुलैला होणाऱ्या महासभेत घेतला जाणार आहे. दरम्यान, वरुणराजा भरूभरून बरसल्याने गोदामाई दुथडी भरून वाहिली. गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे गोदामाईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आषाढी एकादशीचा सुमुहूर्त साधत गोदामाईची विधीवत ओटी भरण्यात आली. सिडकोतील मनसेच्या नगरसेवक कांचन पाटील व नामदेव पाटील या दाम्पत्याने साडी-चोळी-बांगड्या देऊन गोदामाईची ओटी भरली, तर महापौर अशोक मुर्तडक यांनी श्रीफळ अर्पण करत जलपूजन केले. विधीचे पौराहित्य पंकज देवळे यांनी केले. यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, मनसेचे गटनेते अनिल मटाले, पश्चिम प्रभाग सभापती शिवाजी गांगुर्डे, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, राजेंद्र महाले, उद्धव निमसे तसेच अधीक्षक अभियंता उत्तम पवार, कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, पी. एम. गायकवाड, धनाईत, उदय धर्माधिकारी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Omega full of godown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.