पाथर्डी शिवारात जुन्याच घंटागाड्या
By Admin | Updated: March 2, 2017 02:08 IST2017-03-02T02:07:57+5:302017-03-02T02:08:52+5:30
पाथर्डी फाटा परिसरातील नवीन प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अजूनही जुनीच घंटागाडी फिरत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पाथर्डी शिवारात जुन्याच घंटागाड्या
पाथर्डी फाटा : महापालिकेतील सत्ताधारी मनसेने मोठा गाजावाजा करीत नव्या घंटागाड्यांचे उद्घाटन करून त्यांच्यामार्फत शहरातील कचरा गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते; मात्र पाथर्डी फाटा परिसरातील नवीन प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अजूनही जुनीच घंटागाडी फिरत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जुन्या घंटागाडीमुळे अनेक समस्याही असल्याने आता या समस्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाच्या राजवटीत तरी सुटतील का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नव्या घंटागाड्यांचा मुद्दा खूपच गाजला. सत्तारूढ मनसेने नव्याने २०६ घंटागाड्या रस्त्यावर आणल्याचा दावा केला. काही गाड्या रस्त्यावर धावत आहेत. शहराच्या बाह्य भागात अनेक ठिकाणी अजूनही जुन्याच घंटागाड्या फिरत आहे. पाथर्डी परिसराचाही त्याला अपवाद नाही. शहरात बहुतेक ठिकाणी नव्या घंटागाड्यांनी कचरा गोळा केला जातो आहे; मात्र पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर, प्रशांतनगरमध्ये अजूनही जुन्याच घंटागाड्या कचरा संकलनासाठी येत आहेत. त्याही वेळेवर व नियमित येत नाहीत. आल्याच तर कचरा न घेता निघून जातात. काही गल्ल्यांमधला कचरा घेतला जातो तर काही गल्ल्यांमध्ये गाडी कचरा न घेताच येऊन गेल्याचे भासवत निघून जाते. खटारा झालेल्या व ट्रॉलीचा पत्रा तुटलेल्या अवस्थेतल्या घंटागाड्या कचरा आणि दुर्गंधी पसरवत जात असल्याने त्यांच्यात कचरा टाकायला जाणेही महिलांना नकोसे वाटते. इतर ठिकाणी नव्या घंटागाड्या सुरू झाल्यात, मग वासननगर आणि प्रशांतनगरमध्येच जुन्या घंटागाड्या का, यामागे राजकारण असून जाणीवपूर्वक भेदभाव केला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रि या महिलांनी व्यक्त केल्या आहेत. (वार्ताहर)