तेलकट पदार्थ, धूम्रपान, मद्यपानाच्या अतिरेकाने अल्सरचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:49+5:302021-09-04T04:18:49+5:30
नाशिक : शहरातील अनेक नागरिकांना तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाण्याची जणू चटकच लागली आहे. त्याचबराेबरच उशिरापर्यंत जागरण, धूम्रपान, ...

तेलकट पदार्थ, धूम्रपान, मद्यपानाच्या अतिरेकाने अल्सरचा धोका !
नाशिक : शहरातील अनेक नागरिकांना तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ खाण्याची जणू चटकच लागली आहे. त्याचबराेबरच उशिरापर्यंत जागरण, धूम्रपान, स्टेरॉइडचा वापर, वारंवार मद्यपान केल्याने अल्सर होण्याचा धोका वाढू शकतो. अनेक नागरिकांच्या पोटातील आम्लता वाढल्यामुळे तर काहींना हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग जठरात झाल्यामुळेही अल्सर होण्याचे प्रकार घडतात. या जंतूची लागण ही दूषित अन्न आणि पाण्यातूनही होऊ शकतेे. त्यामुळेच शहरी भागात अल्सरच्या धोक्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
बऱ्याच वेळा पोटात जळजळ, वेदना आणि उलट्यांचा अनुभव येतो. अल्सर ही एक प्रकारची जखम आहे जी पोट किंवा आतड्यांच्या पृष्ठभागावर हळू हळू विकसित होते. ज्या ठिकाणी अल्सर होतो त्यानुसार त्यास वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अल्सर मुख्यतः पोट आणि आतड्यांच्या आतील पृष्ठभागावरील आम्लयुक्त दुष्परिणामांमुळे होतो. जेव्हा हे आम्ल पृष्ठभागाच्या संपर्कात येते तेव्हा जखमा तयार होतात. पोटातील अल्सरचे दोन प्रकार आहेत - गॅस्ट्रिक अल्सर आणि ड्यूडिनल अल्सर. गॅस्ट्रिक अल्सरमध्ये पोटातील पृष्ठभागावर जखमा तयार होतात, तर ड्यूडिनल अल्सरमध्ये आपल्या लहान आतड्याच्या वरच्या भागावर जखमा बनू लागतात. धूम्रपान, स्टेरॉइडचा वापर, वारंवार मद्यपान केल्याने अल्सर होण्याचा धोका वाढल्याचेही दिसून येत आहे.
इन्फो
काय आहेत कारणे
दूषित अन्न आणि दूषित पाणी
धूम्रपान, तंबाखू, मद्यपान
तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सेवन
वेळी-अवेळी केले जाणारे जेवण
काय आहेत लक्षणे
पोट दुखणे
भूक मंदावणे
उलट्या होणे
वजनात अचानक घट येणे
शौचातून रक्तस्राव
---------------
काय काळजी घेणार
जीवनशैलीतील सकारात्मक बदल हे अल्सर टाळण्यासाठीचा उत्तम उपाय, वारंवार अतिमसालेदार खाणे, धूम्रपान व मद्यपान टाळावे, रात्रीची जागरणे टाळलेलीच बरी, अनेकांना क्रोसिन, काम्बिफ्लॅम किंवा इतर कुठल्याही वेदनाशामक गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते. गरज नसताना या गोळ्यांचा वापर टाळावा. आम्लपित्त कमी होण्यासाठीची औषधे, मानसिक ताणतणाव कमी करणेही महत्त्वाचे ठरते.