तेल सांगून विकले घाण पाणी, घोटीत अनेकांना गंडा
By Admin | Updated: December 29, 2016 15:29 IST2016-12-29T15:29:27+5:302016-12-29T15:29:27+5:30
घोटी शहरातही काही ठगांनी अजब शक्कल लढवून अनेकांना हजारो रुपयाला गंडा घातल्याचे उघडकीस आले.

तेल सांगून विकले घाण पाणी, घोटीत अनेकांना गंडा
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 29 - कोण कोणाला कोणत्या क्लुप्त्या लढवून फसवेल याची कल्पना न केलेलीच बरी. घोटी शहरातही काही ठगांनी अजब शक्कल लढवून अनेकांना हजारो रुपयाला गंडा घातल्याचे उघडकीस आले. या ठगांनी चक्क नदीचे मातीमिश्रित पाणी काही बॅरेलमध्ये भरून चक्क 50 रुपये लिटरने विक्री केल्याची बाब समोर आली आहे.
घोटी शहर ही व्यावसायिक प्रमुख बाजारपेठ. शहरात तसा शनिवार व मंगळवार या दोन दिवस आठवडेबाजार भरत असला तरी दरदिवशी बाजारपेठेत फार मोठी वर्दळ असते. शहरात स्थानिकासह, नाशिक व लगतच्या शहापूर अकोले तालुक्यातून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक विविध साहित्य विक्रीसाठी आणतात.
दरम्यान गुरूवारी एक पीक अप वाहन शहरात भल्या सकाळीच दाखल झाले. यात काही इसमही होते. या इसमानी पीक अपमधून आपण तेल डबे आणले असून हे डबे सवलतीच्या दरात विकण्याचे आहे असे दर्शवून तीन डबे 2700 रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती बाजारपेठेत दिली. इतक्या स्वस्तात शेंगदाणा तेल मिळत असल्याने ग्राहकांनी तात्काळ या तेलाची खरेदी केली.
मात्र घरी घेऊन गेल्यानंतर तेलाचे डबे उघडून पाहिले असता त्यात चक्क नदीचे गढूळ पाणी असल्याची बाब समोर आली. मात्र आपल्याला पुरते फसवले गेल्याची बाब समोर आल्यानंतरही विनाकारण चर्चा नको म्हणून फसगत झालेल्यांनीही कोणाला कळवले नाही अथवा पोलिसात तक्रारही दिली नाही, मात्र तेलाच्या ऐवजी पाणी हा विषय तालुक्यात चर्चिला जात आहे.