पालिका पदाधिकाऱ्यांची सुरतवारी अखेर रद्द

By Admin | Updated: October 13, 2015 23:35 IST2015-10-13T23:27:56+5:302015-10-13T23:35:21+5:30

पाहणी दौरा : विरोधकांच्या टीकेनंतर माघार

Officials of the municipal corporation canceled at the end of the day | पालिका पदाधिकाऱ्यांची सुरतवारी अखेर रद्द

पालिका पदाधिकाऱ्यांची सुरतवारी अखेर रद्द

नाशिक : घंटागाडीचा ठेका तीन वर्षांऐवजी दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा घाट घालतानाच त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.१४) निश्चित केलेला सुरतमधील कचरा संकलन व वाहतुकीसंबंधीचा अभ्यासदौरा महापालिका पदाधिकाऱ्यांनी अखेर विरोधकांच्या टीकेनंतर रद्द केला आहे.
महापालिका प्रशासनाकडून घंटागाडीचा ठेका तीन वर्षांऐवजी दहा वर्षे कालावधीसाठी देण्याचा घाट घातला जात असून, त्यासाठी सत्ताधारी मनसेचे मतपरिवर्तन करण्यात प्रशासनाला यश आल्याची चर्चा सुरू आहे. येत्या शनिवारी (दि.१७) होणाऱ्या महासभेत प्रशासनाकडून दहा वर्षे मुदतीचा घंटागाडी ठेक्याचा प्रस्ताव पुन्हा आणला जाण्याची शक्यता असून, त्यापूर्वीच सुरत येथील कचरा संकलन आणि वाहतुकीसंदर्भात अभ्यासदौऱ्याचेही नियोजन करण्यात आले. त्यानुसार, बुधवारी (दि.१४) महापौर, उपमहापौरांसह पदाधिकाऱ्यांचा सुरत दौरा निश्चित करण्यात आला होता. परंतु, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते आणि विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक यांनी या दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित करत घंटागाडीच्या ठेक्याविषयी टीकास्त्र सोडले होते. ठेकेदाराच्या तालावर नाचणाऱ्या सत्ताधारी मनसेच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करतानाच सदर अभ्यासदौरा म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप करत शिवसेनेने दीर्घ मुदतीच्या ठेक्याला आपला विरोध दर्शविला होता. सुरत दौऱ्यावर न जाण्याची भूमिकाही विरोधी पक्षांनी जाहीर केली होती. विरोधकांनी घेतलेला पवित्रा आणि होणारी टीका पाहता अखेर पदाधिकाऱ्यांची सुरतवारी रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानावरून पदाधिकाऱ्यांना दौरा रद्द झाल्याचे कळविण्यात आले.

Web Title: Officials of the municipal corporation canceled at the end of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.