अधिकाऱ्यांनी केला आळस; ठेकेदाराने गाठला कळस
By Admin | Updated: September 12, 2014 00:10 IST2014-09-11T21:50:27+5:302014-09-12T00:10:45+5:30
अधिकाऱ्यांनी केला आळस; ठेकेदाराने गाठला कळस

अधिकाऱ्यांनी केला आळस; ठेकेदाराने गाठला कळस
आझादनगर : येथील महानगरपालिकेच्या बांधकाम, विभागाच्या नाकर्तेपणामुळे आझादनगर पोलीस ठाणे ते अलीअकबर दवाखान्यापर्यंत नाल्याचे सहा महिने मुदतीचे काम तब्बल दीड वर्षे उलटूनही अपूर्ण असताना ठेकेदारास २५ टक्के रक्कम अदा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यास काम पूर्ण करण्याची साधी ताकीदही देण्यात आलेली नाही. यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या उदासीनतेविषयी नागरिकांत चर्चा सुरू असून, महापालिकेची अशी अनेक प्रकरणे पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.
आझादनगर पोलीस ठाणे ते अली अकबर हॉस्पिटलपर्यंतचा नाला बांधण्यासाठी शासनाच्या डी. पी. आर. योजनेअंतर्गत सुमारे २१ लाख ९२ हजार २९९ रुपयास ठेका देण्यात आला. या कामासाठी मनपाकडून ठेकेदारास १२ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. या कार्याआदेशानुसार संबंधित ठेकेदारास सदर काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती. यासाठी उपायुक्त आदेश क्र. ४३/दि.२६/१२/१२ अन्वये मान्यता देत सदर कामाची तीव वर्षासाठी देखभाल करण्यासह बांधकाम ठेका देण्यात आला. यासाठी मनपा महासभा ठराव क्र.३७८/दि.२१/९/२०१३ रोजी मंजुरीही देण्यात आली. परंतु ठेकेदाराने तब्बल एक वर्ष उलटून गेले तरी कामास प्रत्यक्ष सुरुवातही केली नव्हती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी सदर कामास प्रत्यक्ष प्रारंभ केला; परंतु अद्याप पावेतो आझादनगर पोलीस ठाणे ते तवक्कल मशिदपर्यंतचे काम पूर्ण केलेले आहे. जे काम झाले तेही निकृष्ठ दर्जाचे आहे. मनपाकडून झालेले कामाचा दर्जा न तपासता २५ टक्के रक्कम अदा करण्यात आली. विशेष म्हणजे सदर काम उन्नती कन्स्ट्रक्शन या संस्थेस दिले गेले
होते. मनपा व सदर ठेकेदार यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार सहा महिन्यांत काम पूर्ण न झाल्यास या कामास प्रति दिवस ७५० रुपये दंड आकारण्यात येईल, असे त्यात म्हटले असताना त्यांना दंडाची रक्कम वसूल करण्याबाबत साधी नोटीसही देण्यात आलेली नाही. म्हणून या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची शंका नागरिकांत व्यक्त
होत असून सदर कामाची
चौकशी करून संबंधित दोषींवर
योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)