पायी पेट्रोलिंग करीत अधिकाऱ्यांचा संवाद

By Admin | Updated: October 27, 2015 22:35 IST2015-10-27T22:34:23+5:302015-10-27T22:35:18+5:30

नवा उपक्रम : महिला, नागरिकांकडून स्वागत

Official communication | पायी पेट्रोलिंग करीत अधिकाऱ्यांचा संवाद

पायी पेट्रोलिंग करीत अधिकाऱ्यांचा संवाद

नाशिकरोड : नाशिकरोड-उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पायी पेट्रोलिंग करत दुकानदार, रहिवासी आदिंशी संवाद साधला. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे नागरिक, महिलांनी स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये गॅँगवारचा भडाका, खून, मारामाऱ्या, छेडछाड, भाईगिरी, दागिने हिसकावून नेणे आदि घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीती, दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, नागरिक, व्यापाऱ्यांशी सुसंवाद, पोलीस-मित्राची भूमिका व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहराच्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारपासून दररोज सायंकाळी १५ दिवस वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी पायी पायी पेट्रोलिंग हा उपक्रम राबविणार असल्याने पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी जाहीर केले होते.
उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी उपनगर भागात, तर देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅम्प भागात पायी पेट्रोलिंग करून नागरिकांशी संवाद साधला. यामुळे बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालक, चौकाचौकातील टवाळखोर हे त्या-त्या भागातून काही वेळाकरिता गायब झाले होते. (प्रतिनिधी)
नागरिकांना मार्गदर्शन

बिटको चौकातून सायंकाळी सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड, रंजना बनसोडे आदिंनी जेलरोडपर्यंत पायी पायी पेट्रोलिंग करत दुकानदार, नागरिक, महिला, युवक आदिंशी संवाद साधून कायदा-सुव्यवस्थेबाबत घ्यावयाची काळजी आदिंबाबत मार्गदर्शन केले. पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, व्हॉट्सअप मोबाइल नंबर, तसेच अधिकाऱ्यांनी आपले स्वत:चे मोबाइल क्रमांक नागरिकांना देऊन पोलीस मित्र म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Web Title: Official communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.