बोनससाठी पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: October 24, 2014 01:03 IST2014-10-24T00:53:22+5:302014-10-24T01:03:19+5:30
बोनससाठी पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात

बोनससाठी पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात
सातपूर : दिवाळी सणासाठी हक्काचा बोनस न देणाऱ्या सिएट कंपनी व्यवस्थापनाचा धिक्कार करीत कामगारांनी सोशल मीडियाद्वारे निषेध व्यक्त केला आहे, तर बोनसच्या मागणीसाठी युनियन पदाधिकारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
बोनस मिळाल्याने जिल्ह्यातील कामगार दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असताना, सातपूर औद्योगिक वसाहतीतील नामांकित सिएट कंपनी व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यातील बोनस कराराची मंगळवारची बैठक फिसकटल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आतापर्यंत सहा बैठका घेण्यात येऊनही एकमत होऊ शकले नाही. किती बोनस जाहीर होणार? या अपेक्षेने बसलेल्या कामगारांचा अपेक्षाभंग झाला आहे. हक्काचा बोनस घेणारच; त्यासाठी आंदोलन करण्याची वेळी आली तरी चालेल, असा ठाम विश्वास युनियन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिकबरोबरच भांडुप सिएट कामगारही बोनसपासून वंचित राहिले असल्याचे समजते.
मंगळवारी मुंबई येथे आयोजित बैठकीत बोनसचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंबई श्रमिक संघाच्या सातपूर येथील स्थानिक अध्यक्ष भिवाजी भावले, उपाध्यक्ष सुनील थिंगे, अशोक देसाई, सरचिटणीस गोकुळ घुगे, खजिनदार दीपक अनावट, सहसचिव आद्यशंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख, राजन पालव आदिंनी भांडूप येथील सिएट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर काळे शर्ट परिधान करून व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)