मालेगाव : तालुक्यातील निमगाव निंबायती येथे विवाहितेस मुलासह आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरच्या पाच जणांविरुध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी केदू गांगुर्डे (५५) रा. तिसगाव, तालुका - चांदवड यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सकाळी निमगाव निंबायती येथील ज्ञानेश्वर सुभाष शिंदे यांनी आपल्या सासरच्यांना आपली पत्नी सौ. जयश्री ज्ञानेश्वर शिंदे ( २५) व मुलगा ऋषीकेश ज्ञानेश्वर शिंदे (५) ही दोघे घरातून बेपत्ता झाले असल्याचे फोनद्वारे कळवले. त्यानुसार सौ. जयश्रीच्या माहेरची मंडळी तिच्या सासरी पोचली. तेथे दोघा मायलेकांचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत आढळून आला. याप्रकरणी मयत सौ. जयश्रीस सासरची मंडळी सतत पैशांच्या मागणीवरुन, सासरी वडीलधाऱ्यांना मान देत नाही व स्वंयपाक नीट करत नाही असा आरोप करुन छळ करत असत. य छळातून त्यांनी तिला मुलासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार तालुका पोलिसांनी मयत सौ. जयश्रीचा पती ज्ञानेश्वर शिंदे यास अटक केली आहे. तसेच तिचे सासरे सुभाष सखाराम शिंदे, जेठ साहेबराव सुभाष शिंदे, सासु इंदूबाई सुभाष शिंदे व जेठाणी सौ. ज्योती साहेबराव शिंदे या चार जणांविरुध्द गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. गोपनारायण करत आहेत.